देवलापार परिसरात वाघाचा हल्ला; ३५ वर्षीय महिलेचा मृत्यू

सावरा गावाजवळ शेतात काम करताना दुर्दैवी घटना; नागरिकांत भीतीचे वातावरण
रामटेक (जि. नागपूर) : देवलापार परिसर पुन्हा एकदा वाघाच्या हल्ल्यामुळे हादरला आहे. शेतात काम करत असलेल्या ३५ वर्षीय महिलेचा वाघाच्या झडपीत दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना आज दुपारी उघडकीस आली. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांकडून तातडीने ठोस उपाययोजनांची मागणी केली जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रामटेक तालुक्यातील देवलापारजवळील सावरा गाव परिसरात ही घटना घडली. मुक्ता जोगड्या मरसकोल्हे (वय ३५) या नेहमीप्रमाणे दुपारी अंदाजे एक वाजताच्या सुमारास शेतात काम करत होत्या. त्याचवेळी दबा धरून बसलेल्या वाघाने अचानक त्यांच्यावर झडप घातली. हल्ला इतका भीषण होता की त्यांचा जागीच मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच गावकऱ्यांनी मोठ्या संख्येने शेताकडे धाव घेतली; मात्र तोपर्यंत उशीर झाला होता. मागील काही दिवसांपासून परिसरात वाघाच्या हालचाली वाढल्या असल्याची चर्चा सुरू होती. त्यामुळे शेतकरी आणि नागरिकांमध्ये आधीपासूनच भीतीचे वातावरण होते.
घटनेची माहिती मिळताच वन विभागाचे अधिकारी व कर्मचारी तसेच देवलापार पोलीस घटनास्थळी दाखल झाले. मृतदेहाचा पंचनामा करून पुढील तपासणीसाठी देवलापार येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात हलविण्यात आला. संबंधित वाघाचा शोध घेण्यासाठी विशेष पथक तयार करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
या घटनेनंतर संतप्त नागरिकांनी शेतकऱ्यांच्या सुरक्षेसाठी कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात, वाघाचा तातडीने बंदोबस्त करावा तसेच वन विभागाने गस्त वाढवावी, अशी मागणी जोर धरत आहे.



