यवतमाळ जिल्हा : आर्णी परिसरात ढाब्यावर छापा; हेरॉईन व डोडा पावडरसह ३.३५ लाखांचा मुद्देमाल जप्त

यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी परिसरातून अंमली पदार्थांविरोधात मोठी कारवाई समोर आली आहे. नागपूर–तुळजापूर महामार्गालगत असलेल्या एका ढाब्यावर सुरू असलेली अंमली पदार्थांची विक्री स्थानिक गुन्हे शाखेने उघडकीस आणली. या कारवाईत लाखोंचा मुद्देमाल जप्त करत दोन जणांना ताब्यात घेण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, १८ फेब्रुवारी २०२६ रोजी सायंकाळी मिळालेल्या गुप्त माहितीनुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तात्काळ कारवाई करत सुकळी शिवारातील दशमेश पंजाबी ढाब्यावर छापा टाकला.
या कारवाईत १८.१५ ग्रॅम हेरॉईन (चिट्टा) किंमत १ लाख ८१ हजार ५०० रुपये तसेच २७ किलो ७२१ ग्रॅम पॉपी स्ट्रॉ (डोडा पावडर) किंमत १ लाख ३८ हजार ६०५ रुपये असा एकूण ३ लाख ३५ हजार २४५ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
या प्रकरणी सरबजीतसिंग ऊर्फ करण भुट्टासिंग ढिलोन (वय ३७) आणि जगिरसिंग मख्त्यारसिंग सिंधू (वय ५३), दोन्ही रा. सुकळी शिवार, यांना ताब्यात घेण्यात आले आहे.
दोन्ही आरोपींविरुद्ध एनडीपीएस कायद्यानुसार कलम ८ (c), १५ (b) आणि २१ (b) अंतर्गत आर्णी पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
जिल्ह्यातील अवैध धंदे आणि गुंगीकारक औषधांच्या तस्करीवर आळा घालण्यासाठी ही कारवाई पोलीस अधीक्षक कुमार चिंता यांच्या आदेशानुसार करण्यात आली. अपर पोलीस अधीक्षक अशोक थोरात आणि उपविभागीय पोलीस अधिकारी सिद्धेश्वर भोरे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ही मोहीम यशस्वीरीत्या पार पाडली.



