छत्रपती शिवरायांचे विचार युवा पिढीने अंगिकारावे – कुलसचिव डॉ. अविनाश असनारे

विद्यापीठातील आजीवन अध्ययन विभागाच्यावतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 396 व्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन
अमरावती (दि.16.02.2026) – छत्रपती शिवाजी महाराजांचे कार्य केवळ इतिहासाच्या पानांत राहू न देता, आजच्या युवा पिढीने शिवरायांचे विचार अंगिकारावे, असे आवाहन कुलसचिव डॉ. अविनाश असनारे यांनी केले. संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठातील आजीवन अध्ययन व विस्तार विभागाच्यावतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 396 व्या जयंतीनिमित्त आयोजित शिवकालिन शस्त्र प्रदर्शनीच्या उद्घाटन कार्यक्रमात ते बोलत होते. व्यासपीठावर आजीवन अध्ययन विभागाचे संचालक डॉ. श्रीकांत पाटील, उपकुलसचिव डॉ. मिनल मालधुरे, विद्यापीठ कर्मचारी संघाचे अध्यक्ष श्री अजय देशमुख, स्वराज्य सेवा प्रतिष्ठानचे श्री शिवा काळे, आय.आय.एम.सी.चे संचालक डॉ. राजेश कुशवाह उपस्थित होते.
कुलसचिव पुढे म्हणाले, पदवी शिक्षणाचे दिवस हे आयुष्यातील महत्त्वाचे असतात. हा काळ जो युवक सत्कारणी लावेल, तो समाजासाठी नवी पायाभरणी करू शकेल. सोशल मीडियाचा वापर करतांना तंत्रज्ञानाचा वापर विधायक कामासाठी करावा असे सांगून छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीचे औचित्य साधून त्यांच्या विचारांचा संकल्प करण्याचे आवाहन त्यांनी याप्रसंगी केले.
श्री शिवा काळे म्हणाले, स्वयंसेवी संस्थेकडून अमरावती जिल्ह्यातील ऐतिहासिक स्थळांची स्वच्छता करण्यात आली, ते स्थळ एकेकाळी मुख्य जलस्त्रोत होते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रशासकीय कौशल्यांचा वारसा जपण्यासाठी विद्यापीठाने विशेष अभ्यासक्रम सुरू केला आहे. गावीलगड किल्ल्याचा इतिहास लोकांपर्यंत नेण्यासाठी विशेष वार्षिकांकाचे प्रकाशन करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.
डॉ. मिनल मालधुरे म्हणाल्या, विद्यापीठाच्या आजीवन अध्ययन व विस्तार विभागाद्वारे शिवजयंतीनिमित्त छत्रपती शिवाजी महाराजांच्या शस्त्रास्त्रांचे विशेष प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. सांस्कृतिक वारसा या माध्यमातून जोपासण्याचा हा प्रयत्न असून या माध्यमातून विद्याथ्र्यांमध्ये इतिहासाची आवड निर्माण करणे, शस्त्रास्त्रांमागील विज्ञान सांगणे आणि महाराजांचे विचार नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचा मुख्य उद्देश असल्याचे त्या म्हणाल्या.
विद्यापीठ गीत व महाराष्ट्र गीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली. छत्रपती शिवाजी महाराज व संत गाडगे बाबा यांच्या प्रतिमेचे मान्यवरांच्या हस्ते पुजन करण्यात आले. शस्त्रप्रदर्शनीची यावेळी मान्यवरांनी पाहणी केली. प्रास्ताविकेतून संचालक डॉ. श्रीकांत पाटील यांनी 16 ते 19 फेब्राुवारी दरम्यान शिवजयंती उत्सवानिमित्त आयोजित विविध स्पर्धेची माहिती दिली. संचालन आदित्य पुंड यांनी, तर आभार डॉ. अनघा देशमुख यांनी मानले. कार्यक्रमाला आय.आय.एम.सी. चे शिक्षक, जनसंपर्क अधिकारी डॉ. विलास नांदुरकर, आजीवन अध्ययन विभागातील शिक्षक, विद्यार्थी मोठ¬ा संख्येने उपस्थित होते.



