ST Worker Strike: एसटी कर्मचाऱ्यांचा संपाचा इशारा! ३ दिवसांत निर्णय झाला नाही तर चाके थांबणार? वाचा नेमकं प्रकरण

मुंबई: आपल्या विविध मागण्यांसाठी वारंवार रस्त्यावर उतरणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांनी पुन्हा एकदा आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. राज्य सरकारने वाढीव वेतनाचा फरक (Arrears) देण्याचे कबूल करूनही प्रत्यक्ष रक्कम न दिल्याने कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे. येत्या १० फेब्रुवारीपर्यंत म्हणजेच अवघ्या ३ दिवसांत ही रक्कम न मिळाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसने दिला आहे.
नेमका वाद काय?
राज्य सरकारने सन २०२० ते २०२४ या कालावधीसाठी कर्मचाऱ्यांना वेतनवाढ जाहीर केली होती. या वेतनवाढीचा फरक हप्ता म्हणून दरमहा साधारण ६५ कोटी रुपये देण्याचे आश्वासन सरकारने १३ ऑक्टोबर २०२५ रोजी झालेल्या बैठकीत दिले होते. मात्र, गेल्या दोन महिन्यांपासून ही रक्कम राज्य सरकारकडून महामंडळाला मिळालेली नाही.
सरकारकडून ‘घोर फसवणूक’?
महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बरगे यांनी सरकारवर गंभीर आरोप केले आहेत:
- दोन महिने महामंडळाने भार सोसला: गेल्या दोन महिन्यांपासून सरकारने पैसे दिले नसतानाही एसटी महामंडळाने स्वतःच्या तिजोरीतून कर्मचाऱ्यांना फरक दिला होता.
- यावेळची स्थिती: महामंडळाने २० जानेवारी रोजी राज्य सरकारकडे तीन महिन्यांची थकबाकी म्हणजेच ११६.६९ कोटी रुपयांची मागणी केली होती. मात्र, ही रक्कम न आल्याने व्यवस्थापनाने या महिन्यात फरकाशिवाय केवळ मूळ वेतन दिले आहे.
- बैठकीतील आश्वासनाचा विसर: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत हा निर्णय झाला होता, तरीही त्याची अंमलबजावणी झालेली नाही.
आकडेवारी काय सांगते?
एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी दरमहा सुमारे ४७५ कोटी रुपये लागतात. त्याव्यतिरिक्त वाढीव वेतन फरकासाठी ५८ कोटी ३० लाख रुपयांची अतिरिक्त गरज असते. एकीकडे ४२०० कोटी रुपयांची वैधानिक देणी थकलेली असताना आता चालू हप्तेही मिळत नसल्याने कर्मचाऱ्यांची अवहेलना होत असल्याची भावना व्यक्त केली जात आहे.
१० फेब्रुवारीचा अल्टिमेटम
“राज्य सरकारने एसटी कर्मचाऱ्यांची घोर फसवणूक केली आहे. जर १० तारखेच्या आत वाढीव वेतनाच्या फरकाची रक्कम दिली नाही, तर आम्ही रीतसर नोटीस देऊन राज्यभर तीव्र आंदोलन आणि संप पुकारू,” असा इशारा श्रीरंग बरगे यांनी दिला आहे.



