अमरावतीमध्ये अखिल भारतीय आंतरविद्यापीठ सॉफ्टबॉल महिला स्पर्धेचे दिमाखदार उद्घाटन

98 विद्यापीठांचा सहभाग….. पाच दिवस रंगणार सामने…देशपातळीवर भव्य आयोजन
अमरावती : संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ व श्री शिवाजी शिक्षण संस्था संचालित श्री शिवाजी विज्ञान महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘अखिल भारतीय आंतरविद्यापीठ सॉफ्टबॉल (महिला)स्पर्धा २०२५-२६’ चे भव्य उद्घाटन उत्साहात संपन्न झाले. सॉफ्टबॉलच्या इतिहासात प्रथमच महिला आणि पुरुष अशा दोन्हीगटांच्या राष्ट्रीय स्पर्धा एकाच वेळी आणि एकाच ठिकाणी आयोजित करून अमरावतीने एक नवा इतिहास रचला आहे. आज झालेल्या उद्घाटन समारंभात प्रमुख अतिथी म्हणून अमरावतीचे जिल्हाधिकारी श्री आशिष येरेकर, विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मिलींद बारहाते, संस्थेचे कोषाध्यक्ष श्री दिलीपबाबू इंगाले, प्र-कुलगुरू डॉ. महेंद्र ढोरे, महाराष्ट्र सॉफ्टबॉल असोसिएशनचे सहसचिव डॉ. सुरजसिंह येवतीकर, व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. मनीषा कोडापे, डॉ. श्वेता बारहाते, डॉ. सौ स्वाती ढोरे, सौ. निर्मलाताई हर्षवर्धन देशमुख, सौ प्रेरणाताई दिलीपबाबू इंगोले, सौ मीनाताई विजय ठाकरे, शारीरिक शिक्षण व क्रीडा मंडळाचे संचालक डॉ. तनुजा राऊत, सदस्य प्राचार्य डॉ. सुभाष गावंडे, डॉ. सतीश पहाडे, डॉ. विकास टोणे, प्राचार्य डॉ. जी व्ही कोरपे, डॉ. रूपाली इंगोले, ए. आय. यु. चे निरीक्षक श्री दिलीप तूरकी, स्पर्धेचे मुख्य परीक्षक श्री मुकुंद देशपांडे आदी उपस्थित होते.
खेळ माणसांना जोडतो – जिल्हाधिकारी आशिष येरेकर
प्रमुख अतिथी म्हणून खेळाडूंना संबोधित करताना जिल्हाधिकारी येरेकर यांनी अमरावतीच्या पावन भूमीत सर्व खेळाडूंचे स्वागत केले. ते म्हणाले की, “अमरावती ही अंबादेवी, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आणि कर्मयोगी श्री संत गाडगे बाबा यांची भूमी आहे. या भूमीने देशाला अनेक नामवंत खेळाडू दिले आहेत. खेळाचे महत्त्व अधोरेखित करताना त्यांनी सांगीतले की, भारतातील विविध राज्यांतून आलेल्या खेळाडूंमुळे शहरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, खेळ हे सर्व प्रांतांना एकत्र जोडण्याचे एक महत्त्वाचे साधन आहे. “केवळ शिस्तबद्ध व्यक्तीच आयुष्यात खऱ्या अर्थाने प्रगती करू शकतो.” खेळांमुळे आयुष्यात शिस्त येते. संघभावना आणि स्वतःवरचा विश्वास या गोष्टी खेळामुळे शिकायला मिळतात, ज्यामुळे खेळाडूच्या व्यक्तिमत्वाचा सर्वांगीण विकास होतो. पुढील चार दिवस चालणाऱ्या या स्पर्धेत देशभरातील विविध विद्यापीठांचे संघ सहभागी झाले आहेत. जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व महिला खेळाडूंना शुभेच्छा देत त्यांनी देशपातळीवर उत्तम कामगिरी करून देशाचे नाव उज्ज्वल करावे, अशी आशा व्यक्त केली.
श्री दिलीपबाबू इंगोले मनोगत व्यक्त करताना म्हणाले,
अमरावती ही रुक्मिणीची नगरी आणि चिखलदरा हे भीमाचे स्थान (जिथे कीचक वध झाला) असल्याचे सांगून त्यांनी देशभरातून आलेल्या खेळाडूंचे पौराणिक संदर्भासह स्वागत केले. नुकत्याच झालेल्या मुलांच्या स्पर्धा यशस्वीरीत्या पार पडल्या असून, आता ६ ते १० तारखेपर्यंत मुलींच्या स्पर्धा चालणार आहेत. हार-जीत पेक्षा एकता आणि खेळाडूवृत्ती महत्त्वाची आहे. प्रत्येकाने ‘इंडिया’ टीममध्ये खेळण्याचे स्वप्न उराशी बाळगून मैदानात उतरण्याचे आवाहन त्यांनी केले. खेळाडूंच्या राहण्याची आणि जेवणाची उत्तम व्यवस्था करण्यात आली असून, कोणत्याही तांत्रिक किंवा प्रशासकीय अडचणी आल्यास त्या तत्परतेने सोडवण्याचे आश्वासन त्यांनी दिले आहे.
‘विविधतेत एकता‘ हेच भारतीय खेळाचे खरे बलस्थान; कुलगुरू डॉ. मिलींद बारहाते
अध्यक्षीय भाषणातून कुलगुरू डॉ. मिलींद बारहाते यांनी खेळाडूंना संबोधित करताना अमरावतीच्या ऐतिहासिक वारशाचा उल्लेख केला आणि खेळाडूंना ‘टीम स्पिरिट’ने खेळण्याचे आवाहन केले.
अमरावती ही अंबाबाई आणि श्रीकृष्णाची पत्नी रुक्मिणी यांची नगरी आहे. त्यामुळे या जिल्ह्याला मातृशक्तीचा मोठा आशीर्वाद आणि परंपरा लाभलेली आहे. या स्पर्धेसाठी देशभरातून आणि विविध राज्यांतून सुमारे ९८ महिलांचे संघ अमरावतीत दाखल झाले आहेत. जरी प्रत्येकाची भाषा आणि पार्श्वभूमी वेगळी असली, तरी सर्वांच्या मनात भारताविषयीचे प्रेम आणि भावना एकच आहेत. ‘विविधतेत एकता’ हीच आपल्या देशाची खासियत असल्याचे त्यांनी सांगितले. नुकत्याच पार पडलेल्या मुलांच्या स्पर्धेचा उल्लेख करताना कुलगुरूंनी सांगितले की, त्या स्पर्धेत पंचांनी अतिशय पारदर्शक आणि योग्य निर्णय दिले, ज्याचे प्रमाणपत्र सहभागी संघांच्या व्यवस्थापकांनी दिले. महिलांच्या स्पर्धेतही खेळाडूंना असाच न्याय्य आणि पारदर्शक अनुभव मिळेल, अशी ग्वाही त्यांनी दिली.
हार-जीत हा खेळाचा भाग आहे, परंतु विजयासाठी जीवाची बाजी लावतानाच ‘टीम स्पिरिट’ जपणे अधिक महत्त्वाचे आहे, असे आवाहन डॉ. बारहाते यांनी केले व सहभागी सर्व खेळाडूंना शुभेच्छा दिल्यात.
सुरुवातीला क्रीडा ज्योत मान्यवरांच्या हस्ते प्रज्वलित करण्यात आली. कर्मयोगीश्री संत गाडगेबाबा व शिक्षण महर्षी डॉ. पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांच्याप्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. विद्यापीठ गीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली. तिरंगा असलेली फुगे मान्यवरांच्या हस्ते आकाशात सोडण्यात आली. स्मृतीचिन्ह व पुष्प देऊनपाहुण्यांचे स्वागत करण्यात आले. स्वागतपर भाषण महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.जी.व्ही. कोरपे यांनी केले. प्रास्ताविक डॉ. तनुजा राऊत यांनी, संचालन डॉ. रेखा मग्गीरवार व डॉ. मुकुंद भोंडे यांनी केले, तर आभार डॉ. रूपाली इंगोले यांनी मानले. डॉ. अवंतिका मानकर यांनी प्रेरणादायी गीत सादर केले. उद्घाटनकार्यक्रमाला देशभरातील सर्व विद्यापीठांचे सहभागी खेळाडू, विद्यापीठ व शिवाजी शिक्षण संस्थेच्या विविधप्राधिकारणींचे सन्माननीय सदस्य, शिक्षक अधिकारी,कर्मचारी, तसेच गणमान्य नागरिक मोठ्यासंख्येने उपस्थित होते. अमरावतीकर नागरिकांनी या स्पर्धांचा आनंद घ्यावा, असे आवाहन विद्यापीठ व महाविद्यालयाच्यावतीने करण्यातयेत आहे.



