वांद्रे हादरलं! दोघांच्या भांडणात निरपराध प्रवाशाने गमावला डोळा;

मुंबई: मुंबईच्या लोकल ट्रेनमधील प्रवासादरम्यान होणारे वाद आता किती टोकाला जाऊ शकतात, याचा एक भयंकर अनुभव वांद्रे रेल्वे स्थानकावर आला आहे. दोन प्रवाशांच्या वादात एका २८ वर्षीय उच्चशिक्षित तरुणाला आपला डोळा कायमचा गमावावा लागला आहे. ५ फेब्रुवारी २०२६ रोजी रात्री घडलेली ही धक्कादायक घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली असून, यामुळे रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
नेमकी घटना काय?
निशांत रत्नकुमार खत्री (वय २८), जे साकिनाका येथील एका खाजगी कंपनीत अकाउंट्स विभागात काम करतात आणि एमबीए पदवीधारक आहेत, ते नेहमीप्रमाणे अंधेरी-चर्चगेट फास्ट लोकलने घरी परतत होते.
- वाद आणि दगडफेक: रात्री ११ च्या सुमारास ट्रेन वांद्रे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक ५ वर आली. डब्यात दोन प्रवाशांमध्ये जोरदार भांडण सुरू होते. यातील एका प्रवाशाने रागाच्या भरात रुळावर उतरून दगड उचलला आणि डब्यातील दुसऱ्या प्रवाशाला मारण्यासाठी फेकला.
- निशांत ठरले बळी: दुर्दैवाने, तो दगड ज्या प्रवाशावर फेकला होता त्याला न लागता, समोरच्या सीटवर बसलेल्या निशांत खत्री यांच्या डाव्या डोळ्याला अत्यंत वेगाने लागला.
रक्तरंजित प्रवास आणि मदतीचा अभाव
दगड लागताच निशांत यांच्या डोळ्यातून रक्ताच्या धारा वाहू लागल्या. भयंकर गोष्ट म्हणजे, एवढी गंभीर दुखापत होऊनही डब्यातील एकाही प्रवाशाने त्यांना मदत केली नाही किंवा साखळी (Chain pulling) ओढली नाही. अखेर धावत्या गाडीतून उडी मारून निशांत यांनी प्लॅटफॉर्म गाठले आणि रडत, रक्तबंबाळ अवस्थेत स्टेशन मास्तरच्या केबिनपर्यंत चालत गेले.
दृष्टी कायमची गेली
निशांत यांना तात्काळ भाभा आणि नंतर हिंदूजा रुग्णालयात हलवण्यात आले. डॉक्टरांनी तपासणी अंती सांगितले की, निशांत यांच्या रेटिनाला मोठी इजा झाली असून त्यांच्या डाव्या डोळ्याची दृष्टी आता कधीच परत येऊ शकणार नाही. लवकरच त्यांचा साखरपुडा होणार होता, पण एका क्षणाच्या भांडणाने त्यांचे आयुष्य बदलून टाकले आहे.
आरोपीला दादरमधून अटक
वांद्रे रेल्वे पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने तपासाची चक्रे वेगाने फिरवली. अवघ्या काही तासांत आरोपी योगेंद्र वंशराज बौध्द (२६) याला दादर येथून ताब्यात घेण्यात आले. आरोपी मूळचा उत्तर प्रदेशातील आझमगडचा असून तो सध्या मुंबईत मजुरीचे काम करतो. पोलिसांनी त्याच्यावर भारतीय न्याय संहितेच्या कलम ११८(२) अन्वये गुन्हा दाखल केला आहे.



