मैनपुरीत विद्यार्थ्याचे शिक्षिकेवर भररस्त्यात भयंकर हल्ला; व्हिडिओ व्हायरल, आरोपी फरार

उत्तर प्रदेशातील मैनपुरी येथे एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका खासगी महाविद्यालयातील विद्यार्थ्याने एकतर्फी प्रेमाला नकार दिल्याच्या रागातून आपल्या शिक्षिकेवर भररस्त्यात जीवघेणा हल्ला केला. या घटनेचा सीसीटीव्ही व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला असून नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
ही घटना २० जानेवारी रोजी मैनपुरीच्या कोतवाली हद्दीतील आग्रा रोडवर घडली. पीडित शिक्षिका आग्रा रोडवरील एका खासगी कॉलेजमध्ये कार्यरत होती. त्याच कॉलेजमधील अखंड प्रताप नावाचा विद्यार्थी त्यांच्यावर एकतर्फी प्रेम करत होता. आरोपी विद्यार्थी अनेक दिवसांपासून शिक्षिकेचा पाठलाग करत होता आणि रस्त्यावर छेड काढत होता. याबाबत शिक्षिकेने त्याच्या पालकांकडे तक्रारही केली होती, मात्र तरीही त्याचे गैरवर्तन सुरूच होते.
घटनेच्या दिवशी शिक्षिका आग्रा रोडवरील शाळेतून मैनपुरीतील ज्योती रोडवरील दुसऱ्या शाळेत शिकवण्यासाठी जात असताना आरोपीने त्यांना अडवले. त्याने त्यांच्याशी गैरवर्तन केले, प्रेमाची कबुली दिली आणि विरोध झाल्यानंतर रागाच्या भरात बंदुकीचा धाक दाखवला. त्यानंतर धारदार शस्त्राने हल्ला करून त्यांना गंभीर जखमी केले.
ही संपूर्ण घटना जवळील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. घटनेनंतर पीडित शिक्षिकेला तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले, तेथून पुढील उपचारासाठी आग्रा येथील पुष्पांजली रुग्णालयात हलवण्यात आले.
पीडितेच्या भावाने कोतवाली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून आरोपी विद्यार्थी सध्या फरार आहे. त्याचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
दरम्यान, या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर सोशल मीडियावर संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. नागरिकांनी कठोर कारवाईची मागणी केली आहे.
पोलिस तपास सुरू असून आरोपीचा शोध घेतला जात आहे.



