नराधम बाप! सरपंच पदाच्या मोहापायी ७ वर्षांच्या चिमुरडीला कॅनॉलमध्ये फेकले; नांदेड जिल्ह्यातील खळबळजनक घटना
नांदेड : राजकीय महत्त्वाकांक्षा आणि सरपंच पदाची लालसा माणसाला कोणत्या थराला नेऊ शकते, याचा अतिशय धक्कादायक प्रकार नांदेडच्या मुखेड तालुक्यात समोर आला आहे. एका जन्मदात्या पित्याने आपल्या ७ वर्षांच्या चिमुकलीला तेलंगणा राज्यातील कॅनॉलमध्ये फेकून तिची निर्घृण हत्या केली आहे. ‘तिसरे अपत्य’ निवडणुकीत अडथळा ठरू नये, या संशयातून हा पोटच्या गोळ्याचा बळी घेतल्याची चर्चा परिसरात वारंवार होत आहे.
नेमकी घटना काय?
मिळालेल्या माहितीनुसार, मुखेड तालुक्यातील केरूर येथील रहिवासी असलेला आरोपी पांडुरंग कोंडामंगले (३२) हा बाऱ्हाळी येथे सलूनचे दुकान चालवतो. त्याला एकूण तीन अपत्ये होती. तीन दिवसांपूर्वी, “साहित्य खरेदी करायला जातो,” असे पत्नीला सांगून तो आपली ७ वर्षांची मुलगी प्राची हिला सोबत घेऊन घराबाहेर पडला.
मात्र, त्याने तिला थेट तेलंगणा राज्यातील कट्टापल्ली परिसरातील बोधन रोडवरील एका कॅनॉलमध्ये नेले आणि जिवंत फेकून दिले. मुलगी पाण्यात बुडाल्याची खात्री पटल्यानंतर तो एकटाच घरी परतला.
असा उघड झाला गुन्हा
कॅनॉलमध्ये चिमुकलीचा मृतदेह तरंगताना आढळल्याने तेलंगणा पोलिसांनी तपास सुरू केला. तपासाची चक्रे फिरवत असताना पोलिसांचा संशय पांडुरंगवर बळावला. ३० जानेवारी रोजी तेलंगणा पोलिसांनी मुखेडमध्ये येऊन आरोपीला ताब्यात घेतले आणि पोलिसी खाक्या दाखवताच त्याने गुन्ह्याची कबुली दिली.
हत्येमागचे ‘राजकीय’ कारण काय?
या हत्येचे नेमके कारण अद्याप पोलीस तपासात स्पष्ट झाले नसले तरी, परिसरात दोन मुख्य चर्चा सुरू आहेत: १. तिसऱ्या अपत्याचा अडसर: महाराष्ट्र ग्रामपंचायत कायद्यानुसार, दोनपेक्षा जास्त अपत्ये असल्यास निवडणूक लढवण्यास अपात्र ठरवले जाते. आगामी निवडणुकीत सरपंच पदासाठी निवडणूक लढवण्याची पांडुरंगची तयारी होती. हे तिसरे अपत्य आपल्या मार्गातील अडथळा ठरू नये, म्हणून त्याने हे टोकाचे पाऊल उचलल्याचे बोलले जात आहे. २. आर्थिक विवंचना: दुसरीकडे, तो आर्थिक विवंचनेत असल्याने त्याने हे कृत्य केल्याचीही चर्चा आहे.
पोलिसांचा तपास सुरू: तेलंगणा पोलिसांनी आरोपी पांडुरंग कोंडामंगले याला अटक केली असून, हत्येच्या मूळ कारणापर्यंत पोहोचण्यासाठी अधिक तपास केला जात आहे. या घटनेने संपूर्ण नांदेड जिल्ह्यावर शोककळा पसरली असून संताप व्यक्त केला जात आहे.



