Latest NewsNagpur

नागपुरात मध्यरात्री कॅफेमध्ये राडा! किरकोळ वादातून टोळक्याने लावली आग; नंदनवन पोलिसांत गुन्हा दाखल

नागपूर: उपराजधानीत गुन्हेगारीने पुन्हा एकदा डोके वर काढले असून, नंदनवन पोलीस स्टेशनच्या हद्दीतील एका कॅफेमध्ये मध्यरात्री तरुणांच्या दोन गटात तुफान हाणामारी झाली. वादाचे पर्यवसन इतक्या टोकाला गेले की, संतापलेल्या एका गटाने चक्क कॅफेला आग लावून दिली. या धक्कादायक प्रकारामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

नेमकी घटना काय?

नंदनवन परिसरातील एका कॅफेमध्ये मध्यरात्री तरुण-तरुणींची पार्टी सुरू होती. रात्री २ वाजेच्या सुमारास किरकोळ कारणावरून दोन गटांत बाचाबाची झाली. हा वाद इतका वाढला की त्याचे रूपांतर सुरुवातीला शिवीगाळ आणि नंतर जोरदार हाणामारीत झाले. यानंतर मुख्य आरोपी फैझल शेख आणि त्याच्या ७ ते ८ साथीदारांनी रागाच्या भरात कॅफेला आग लावून दिली.

पोलीस कारवाई आणि आरोपी

या प्रकरणी ऋषिकेश राजेश वाघमारे (वय २६, रा. सिरसपेठ) यांच्या फिर्यादीवरून नंदनवन पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

  • मुख्य आरोपी: फैझल शेख (वय २१, रा. राणी दुर्गावती चौक).
  • सह-आरोपी: फैझलचे इतर ७ ते ८ साथीदार. पोलिस सध्या सर्व फरार आरोपींचा शोध घेत असून सीसीटीव्ही फुटेजची तपासणी सुरू आहे.

कॅफे संस्कृती की गुन्हेगारीचा अड्डा?

नागपूर शहरात सध्या ‘पडदे’ लावलेल्या कॅफेंचा सुळसुळाट झाला आहे. हे कॅफे ओयो (OYO) हॉटेल्सच्याही पुढचा प्रकार असल्याचे बोलले जात आहे. इंस्टाग्राम आणि सोशल मीडियावर अशा कॅफेंचे रिल्स व्हायरल करून तरुण पिढीला आकर्षित केले जाते. या कॅफेमध्ये चालणाऱ्या संशयास्पद हालचालींमुळे गुन्हेगारी वाढतेय का? असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.

“रात्री उशिरापर्यंत सुरू राहणारे हे कॅफे आणि तिथे मिळणारी अनियंत्रित सूट यामुळे शहराचे सामाजिक स्वास्थ्य धोक्यात येत आहे,” अशी चर्चा नागरिक करत आहेत.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button