नांदेड हादरलं! निवडणुकीसाठी नराधम बापाने ७ वर्षांच्या पोटच्या लेकीला संपवलं; कटामध्ये सरपंच आणि आईचाही सहभाग

नांदेड: राजकारणाची हाव माणसाला कोणत्या थराला नेऊ शकते, याचा एक अत्यंत भयानक आणि सुन्न करणारा प्रकार नांदेडमध्ये समोर आला आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत ‘तिसरे अपत्य’ अडसर ठरू नये, या हेतूने एका पित्याने आपल्या ७ वर्षांच्या चिमुरडीची हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. विशेष म्हणजे, या क्रूर कृत्यात गावचा सरपंच आणि खुद्द मुलीच्या आईचाही समावेश असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे.
नेमकं प्रकरण काय?
आरोपी पांडुरंग कोंडमंगले हा मुखेड शहरात आपल्या कुटुंबासह राहतो. पांडुरंगला एक मुलगा आणि दोन जुळ्या मुली अशी तीन मुले आहेत. २९ जानेवारी रोजी दुपारी १२ च्या सुमारास पांडुरंगने “नांदेडला जातो” असे सांगून मुलगी प्राचीला दुचाकीवरून नेले. मात्र, तिला तेलंगणातील कडपल्ली येथे नेऊन तिची हत्या केली आणि तो शांतपणे घरी परतला. सुरुवातीला त्याने आर्थिक चणचणीमुळे हे पाऊल उचलल्याचा बनाव केला होता, मात्र पोलिसांनी खाक्या दाखवताच त्याने निवडणुकीसाठी हे कृत्य केल्याची कबुली दिली.
हत्येमागे ‘तीन अपत्यांचा’ नियम
आरोपी पांडुरंगला राजकीय महत्त्वाकांक्षा होती. गावचे सरपंचपद ओबीसी प्रवर्गासाठी राखीव असल्याने त्याला निवडणूक लढवायची होती. मात्र, महाराष्ट्राच्या निवडणूक नियमानुसार दोनपेक्षा जास्त अपत्ये असल्यास उमेदवारी अर्ज बाद होतो. हाच अडसर दूर करण्यासाठी त्याने आपल्या एका मुलीचा बळी घेण्याचे ठरवले.
आई आणि सरपंचाचाही कटामध्ये सहभाग
तपासात समोर आलेली सर्वात धक्कादायक बाब म्हणजे या हत्येची पूर्ण कल्पना मुलीच्या आईला होती. तसेच, या कटात केरुर गावचे सरपंच गणेश चंद्रकांत शिंदे यांचाही सक्रिय सहभाग होता. तेलंगणा पोलिसांनी सरपंच शिंदे यांना अटक केली असून, आता पोलीस आरोपपत्रात आईचाही समावेश करणार आहेत.
काय सांगतो ‘तीन अपत्य’ निवडणूक नियम?
महाराष्ट्रात लहान कुटुंबाला प्रोत्साहन देण्यासाठी २००१ पासून काही कडक नियम लागू करण्यात आले आहेत:
- स्थानिक स्वराज्य संस्था: ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगरपालिका आणि महापालिका निवडणुकांसाठी २ पेक्षा जास्त मुले असल्यास उमेदवार अपात्र ठरतो.
- अपवाद: १२ सप्टेंबर २००१ पूर्वी जन्मलेल्या मुलांच्या बाबतीत काही सवलती आहेत, मात्र त्यानंतर जन्मलेल्या मुलांमुळे ही अपात्रता लागू होते.
- हेतू: लोकसंख्या नियंत्रणाबाबत जनजागृती करणे आणि लोकप्रतिनिधींनी समाजासमोर आदर्श ठेवणे.
“एकीकडे सरकार मुलींच्या संरक्षणासाठी ‘लाडकी लेक’ सारख्या योजना राबवत असताना, दुसरीकडे केवळ सत्तेच्या हव्यासापोटी पोटच्या मुलीचा बळी दिला जाणे, ही समाजासाठी अत्यंत लाजीरवाणी घटना आहे.”
या घटनेमुळे संपूर्ण नांदेड जिल्ह्यात संतापाची लाट उसळली असून, आरोपींना कठोर शिक्षा देण्याची मागणी होत आहे.



