दलाई लामांचा जागतिक सन्मान! संगीत क्षेत्रातील सर्वोच्च ‘ग्रॅमी’ पुरस्काराने गौरव; चीनचा जळफळाट, फुटीरतेचा लावला आरोप

लॉस एंजेलिस/बीजिंग: तिबेटी आध्यात्मिक धर्मगुरू दलाई लामा यांनी वयाच्या ९० व्या वर्षी संगीत विश्वातील सर्वोच्च मानला जाणारा ‘ग्रॅमी पुरस्कार’ (Grammy Award 2026) जिंकून इतिहास रचला आहे. ग्रॅमीच्या इतिहासात पहिल्यांदाच एखाद्या आध्यात्मिक नेत्याला हा बहुमान मिळाला आहे. मात्र, या जागतिक सन्मानामुळे चीनचा तिळपापड झाला असून, त्यांनी या पुरस्काराला ‘राजकीय षडयंत्र’ संबोधले आहे.
कोणत्या श्रेणीत मिळाला पुरस्कार?
दलाई लामा यांच्या ‘मेडिटेशन्स : द रिफ्लेक्शन्स ऑफ हिज होलिनेस द दलाई लामा’ (Meditations: The Reflections of His Holiness the Dalai Lama) या अल्बमला हा पुरस्कार मिळाला.
- श्रेणी: ऑडिओ बुक, नरेशन आणि स्टोरीटेलिंग रेकॉर्डिंग (Best Audio Book, Narration, and Storytelling Recording).
- विशेषता: या अल्बममध्ये दलाई लामांचे शांतता, करुणा आणि मानवतेवरील विचार मांडले आहेत. या प्रकल्पात सरोद वादक अमजद अली खान आणि त्यांच्या मुलांचाही (अमान आणि अयान अली बंगश) सहभाग आहे.
चीनची आक्रमक प्रतिक्रिया
दलाई लामांना मिळालेल्या या पुरस्कारानंतर चीनने तातडीने निषेध नोंदवला आहे. चिनी परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते लिन जियान यांनी म्हटले की:
“१४ वे दलाई लामा हे निव्वळ धार्मिक व्यक्ती नसून ते धर्माच्या नावाखाली चीनविरोधी फुटीरतावादी कारवाया करणारे राजकीय निर्वासित आहेत. या पुरस्काराचा वापर चीनची प्रतिमा मलिन करण्यासाठी आणि राजकीय हेराफेरीसाठी केला जात आहे.”
दलाई लामांचा शांततेचा संदेश
पुरस्कारावर प्रतिक्रिया देताना दलाई लामा म्हणाले, “हा विजय म्हणजे माझे वैयक्तिक यश नसून आपण सर्वांनी मिळून जगाप्रती जी जबाबदारी स्वीकारली आहे, त्या वैश्विक विचारांचा हा सन्मान आहे. प्रेम, करुणा आणि पर्यावरणाचे रक्षण हाच खरा मानवी धर्म आहे.”



