गोंडवाना व पुणे विद्यापीठाच्या कुलसचिवांची दादासाहेब गवई स्मारकाला सदिच्छा भेट

अमरावती येथील दादासाहेब गवई स्मारकाला नुकतीच शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांनी भेट दिली. गोंडवाना विद्यापीठ (गडचिरोली) चे कुलसचिव डॉ. अनिल हिरेखन, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्रभारी कुलसचिव डॉ. विजय खरे आणि डॉ. बी.आर. वाघमारे यांनी या स्मारकाची पाहणी करून दादासाहेबांच्या प्रेरणादायी जीवनप्रवासाचा आढावा घेतला.
दोन्ही विद्यापीठांच्या कुलसचिवांनी स्मारक परिसरातील माहितीपर प्रदर्शनीला भेट दिली. यावेळी लावण्यात आलेल्या पोस्टरचे त्यांनी बारकाईने वाचन केले. दादासाहेब गवई यांचे सामाजिक आंदोलन, शैक्षणिक क्षेत्रातील अमूल्य योगदान आणि त्यांचा संघर्षमय जीवनप्रवास यावर आधारित मांडणीचे मान्यवरांनी विशेष कौतुक केले.
या मांडणीचे श्रेय डॉ. बी.आर. वाघमारे व डॉ. किशोर फुले यांना जाते. या भेटीचे मुख्य आकर्षण म्हणजे स्मारकात जतन केलेली दादासाहेब गवई यांची ऐतिहासिक भाषणे. डॉ. हिरेखन आणि डॉ. खरे यांनी ही भाषणे अत्यंत तन्मयतेने ऐकली.
“दादासाहेबांच्या विचारांमधील प्रगल्भता आणि समाजाप्रती असलेली निष्ठा आजच्या पिढीसाठी खऱ्या अर्थाने दिशादर्शक आणि प्रेरणादायी आहे,” असे मत यावेळी डॉ. अनिल हिरेखन यांनी व्यक्त केले.
या प्रसंगी स्मारकाचे संपदा व्यवस्थापक धम्मदीप गवई, पर्यवेक्षक अजिंक्य ढोले आणि इतर कर्मचारी उपस्थित होते. या भेटीमुळे दादासाहेबांच्या कार्याचा वारसा नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी स्मारकाद्वारे होत असलेल्या प्रयत्नांचे मान्यवरांनी स्वागत केले.



