सुनेत्रा पवार महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री; ‘त्या’ एका वाक्याने वेधलं संपूर्ण राज्याचं लक्ष!

मुंबई: महाराष्ट्राच्या राजकारणात आज एका नवीन अध्यायाची सुरुवात झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते दिवंगत अजित पवार यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या उपमुख्यमंत्रिपदी सुनेत्रा पवार यांची वर्णी लागली आहे. आज राजभवनातील दरबार हॉलमध्ये त्यांनी पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली. विशेष म्हणजे, सुनेत्रा पवार या महाराष्ट्राच्या इतिहासातील पहिल्या महिला उपमुख्यमंत्री ठरल्या आहेत.
गांभीर्यपूर्वक घेतलेली शपथ चर्चेत
शपथविधी सोहळ्यात सुनेत्रा पवार यांनी आपल्या पहिल्याच वाक्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. सामान्यतः अनेक लोक ‘ईश्वरसाक्ष’ शपथ घेतात, मात्र सुनेत्रा पवार यांनी आपल्या पतीच्या पावलावर पाऊल ठेवत “मी गांभीर्यपूर्वक शपथ घेते की…” असे म्हणत शपथेला सुरुवात केली. त्यांच्या या शैलीची आणि निग्रहाची सध्या संपूर्ण महाराष्ट्रात चर्चा होत आहे.
शपथविधीचा घटनाक्रम
- गटनेतेपदी निवड: आज दुपारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या विधिमंडळ गटनेतेपदी सुनेत्रा पवार यांची एकमताने निवड करण्यात आली.
- शिफारस पत्र: राष्ट्रवादीच्या नेत्यांनी या निवडीचे पत्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ‘वर्षा’ निवासस्थानी जाऊन दिले. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी राज्यपालांकडे सुनेत्रा पवारांच्या नावाची शिफारस केली.
- शपथविधी: सायंकाळी ५ च्या सुमारास राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी त्यांना शपथ दिली. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मंत्रिमंडळातील इतर सदस्य उपस्थित होते.
पंतप्रधान मोदींच्या शुभेच्छा
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोशल मीडियाद्वारे सुनेत्रा पवार यांचे अभिनंदन केले आहे. त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले की:
“महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून कार्यकाळ सुरू करणाऱ्या सुनेत्रा पवार जी यांना शुभेच्छा. मला विश्वास आहे की त्या राज्यातील जनतेच्या कल्याणासाठी अथक परिश्रम करतील आणि दिवंगत अजितदादा पवार यांचे स्वप्न पुढे नेतील.”
राजकीय वारसा आणि जबाबदारी
अजित पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (अजित पवार गट) निर्माण झालेली पोकळी भरून काढण्यासाठी सुनेत्रा पवार यांची निवड महत्त्वपूर्ण मानली जात आहे. सध्या त्या राज्यसभा खासदार आहेत, मात्र आता राज्याच्या राजकारणात त्या सक्रिय भूमिका बजावणार आहेत. त्यांच्याकडे उत्पादन शुल्क (Excise) आणि क्रीडा यांसारखी महत्त्वाची खाती सोपवली जाण्याची शक्यता आहे.



