विद्यापीठातील वुमेन्स स्टडीज सेंटरद्वारा सेमिनार स्पर्धा संपन्न

संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठातील वुमेन्स स्टडीज सेंटरद्वारा ‘स्त्रियांविरुद्ध सायबर गुन्हे : स्वरूप व उपाय’ या विषयावर सेमिनार स्पर्धा संपन्न झाली. विद्यापीठातील शैक्षणिक विभागांमधील विद्यार्थ्यांसाठी ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. विद्यार्थ्यांमध्ये स्त्रियांविरुद्ध घडणाऱ्या सायबर गुन्ह्यांबाबत जाणीव जागृती व्हावी, तसेच त्यावर उपायत्मक दृष्टीने त्यांनी अधिक कार्य करावे, या हेतूने कार्य करावे, या हेतूने सदर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये विविध शैक्षणिक विभागातील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. प्रत्येक स्पर्धकाने विषयाच्या अनुषंगाने संदर्भ देत मांडणी केली. त्यामध्ये प्रथम, द्वितीय, तृतीय आणि दोन प्रोत्साहनपर क्रमांक निवडण्यात आले.
या स्पर्धेत एम.ए. जेंडर अँड वुमेन्स स्टडीज अभ्यासक्रमाचे विद्यार्थी पल्लवी चिमूरकर यांनी प्रथम, गायत्री तळेकर यांनी द्वितीय, प्रफुल्ल कुकडे यांनी तृतीय, प्राजक्ता देशमुख यांनी प्रोत्साहनपर तर शिक्षणशास्त्र विभागातील विद्यार्थी जय काळे यांनी प्रोत्साहनपर क्रमांक पटकाविला. या स्पर्धेचे परीक्षण राज्यशास्त्राच्या अभ्यासक डॉ. सपना रोंघे यांनी केले.
क्रमांक प्राप्त विद्यार्थ्यांना वुमेन्स स्टडीज सेंटरच्या संचालक डॉ. वैशाली गुडधे यांच्या हस्ते ग्रंथसंच भेट देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी विचारमंचावर डॉ. सपना रोंघे यांसह सेंटरचे प्रा. डॉ. भगवान फाळके उपस्थित होते.
बक्षीस वितरणावेळी विद्यार्थ्यांना संबोधित करताना डॉ. वैशाली गुडधे म्हणाल्या, आज समाजात झपाट्याने सायबर गुन्ह्यांचे प्रमाण वाढत आहे. ही एक चिंताजनक बाब आहे. वुमेन्स स्टडीज सेंटरद्वारा या दृष्टीने या पूर्वी महिलांमधील डिजिटल साक्षरता आणि महाविद्यालयीन मुलींमध्ये सायबर सुरक्षा विषयक जागृतीसंदर्भात कार्यक्रम घेण्यात आले. स्त्रियांच्या दृष्टीने सायबर सुरक्षा अतिशय संवेदनशील विषय आहे. त्यादृष्टीने विद्यार्थ्यांनी आपल्या सभोवताली अधिक जागृती करावी. कार्यक्रमाचे सूत्रसंचालक व आभार प्रदर्शन प्रा. पूजा अलोने यांनी केले.



