Latest NewsLaturpolitics

लातूर – लाडकी बहीण योजनेचा गोंधळ : ६१ हजार महिलांचा हप्ता रखडला

महाराष्ट्र सरकारची बहुचर्चित लाडकी बहीण योजना सध्या लातूर जिल्ह्यात अडचणीत सापडली आहे. ई-केवायसी प्रक्रियेत झालेल्या त्रुटींमुळे जवळपास ६१ हजार महिलांचा नोव्हेंबर–डिसेंबरचा हप्ता थांबवण्यात आला असून प्रत्येकी ३ हजार रुपयांचे मानधन मिळालेले नाही.

योजनेत ई-केवायसी बंधनकारक करण्यात आल्यानंतर अनेक लाभार्थ्यांनी प्रक्रिया पूर्ण केली असतानाही चुकीची माहिती नोंदवली गेल्याने लाभ बंद झाल्याचे समोर आले आहे. विशेषतः ई-केवायसीदरम्यान शासकीय नोकरीचा पर्याय निवडला जाणे, एकाच कुटुंबातील इतर महिलांनी लाभ घेतल्याची नोंद, तसेच आधारला मोबाईल क्रमांक लिंक नसणे या कारणांमुळे मोठ्या संख्येने महिलांचे मानधन रखडले आहे.

मागील दोन महिन्यांपासून रक्कम न मिळाल्याने या महिलांचे घरगुती आर्थिक नियोजन कोलमडले असून अनेक कुटुंबांसमोर खर्चाचा प्रश्न उभा राहिला आहे.

दरम्यान, प्रशासनाकडून दिलासा देण्यात आला आहे. आजपासून अंगणवाडी सेविकांच्या मदतीने प्रत्यक्ष पडताळणी सुरू करण्यात येणार असून, त्रुटी दुरुस्त झाल्यानंतर संबंधित महिलांना पुन्हा लाभ देण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

लातूर जिल्ह्यात सध्या एकूण ५ लाख ६७ हजार ४५९ महिला लाभार्थी आहेत. यापैकी ६१ हजार महिलांना नोव्हेंबर आणि डिसेंबरचा हप्ता मिळालेला नाही. प्रशासनाची पडताळणी प्रक्रिया किती वेगाने पूर्ण होते, याकडे लाभार्थी महिलांचे लक्ष लागले आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button