अमरावतीत राष्ट्रीय क्रीडा इतिहास : अखिल भारतीय आंतर-विद्यापीठ सॉफ्टबॉल अजिंक्यपद स्पर्धेचे भव्य आयोजन

श्री शिवाजी विज्ञान महाविद्यालय, अमरावतीने उचलला महाआयोजनाचा शिवधनुष्य
अमरावती – (दि. 30.01.2026) – संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ, अमरावती आणि श्री शिवाजी शिक्षण संस्था, अमरावती संचालित श्री शिवाजी विज्ञान महाविद्यालय, अमरावती यांच्या संयुक्त विद्यमाने अखिल भारतीय आंतर-विद्यापीठ सॉफ्टबॉल अजिंक्यपद स्पर्धा (पुरुष व महिला) २०२५–२६ चे आयोजन करण्यात आले असून, ही स्पर्धा अमरावती विद्यापीठ व अमरावती शहरासाठी ऐतिहासिक आणि मैलाचा दगड ठरणारी राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा ठरणार आहे. ही राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धा दिनांक १ फेब्रुवारी ते १० फेब्रुवारी २०२६ या कालावधीत श्री शिवाजी विज्ञान महाविद्यालय, अमरावती येथे नियोजित दिमाखदार सोहळ्याने सुरु होणार आहे.
या भव्य स्पर्धेमध्ये देशभरातील विद्यापीठांचा अभूतपूर्व प्रतिसाद लाभला असून, पुरुष गटातून १०७ तर महिला गटातून ९८ देशभरातील नामांकित विद्यापीठांचे संघ या स्पर्धेत सहभागी होत आहेत. इतक्या मोठ्या प्रमाणावर विद्यापीठांचा सहभाग असलेली सॉफ्टबॉल स्पर्धा अमरावतीत प्रथमच आयोजित होत आहे, हे या स्पर्धेचे वैशिष्ट्य आहे. पुरुष तसेच महिला गटाची अजिंक्यपद स्पर्धा एकाच यजमान पदाखाली होत असल्यामुळे ३.५ हजाराहून खेळाडूंचे अमरावती शहरात आगमन होणार आहे. देशाच्या कानाकोपऱ्यातील विद्यापीठीय स्पर्धांमध्ये विजेतेपद प्राप्त करून या राष्ट्रीय स्पर्धेत संघ सहभागी होत आहे. या निमित्ताने नामवंत खेळाडू विद्यापीठ चमूचे मार्गदर्शक, सामन्यांचे पंच आणि इतर भूमिकांमध्ये या स्पर्धेच्या निमित्ताने अमरावती शहरात प्रथमतःच येत असल्यामुळे सॉफ्टबॉल या खेळामध्ये आपल्या उज्ज्वल कारकीर्द घडविण्याचे स्वप्न उराशी बाळगणाऱ्या युवा खेळाडूंना हि सुवर्णसंधी प्राप्त झाली आहे.
ग्रँड ओपनिंग सेरेमनी व चॅम्पियनशिप बॅटन प्रोसेशन
या राष्ट्रीय स्पर्धेची सुरुवात भव्य, उत्सवी आणि सांस्कृतिकदृष्ट्या समृद्ध मानल्या जाणाऱ्या ग्रँड ओपनिंग सेरेमनी व चॅम्पियनशिप बॅटन प्रोसेशनच्या माध्यमातून होणार आहे. दिनांक १ फेब्रुवारी २०२६ रोजी दुपारी २.०० वाजता देशभरातील सर्व चॅम्पियन संघ श्री शिवाजी कॉलेज ऑफ फिजिकल एज्युकेशन, डॉ. पंजाबराव देशमुख चौक, पंचवटी, अमरावती येथे एकत्रित येतील. त्यानंतर या ठिकाणाहून चॅम्पियनशिप बॅटन प्रोसेशन प्रारंभ होऊन स्वतंत्र भारताचे पहिले कृषिमंत्री, संविधान सभेचे महत्वपूर्ण घटक म्हणून संविधान निर्मितीत महत्वपूर्ण योगदान देणारे कृषिरत्न शिक्षणमहर्षी डॉ पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांच्या स्मृतीस्थळावर अभिवादन करून चॅम्पियनशिप बॅटन प्रोसेशन श्री शिवाजी विज्ञान महाविद्यालयाच्या क्रीडांगणावर आयोजित भव्य उद्घाटन सोहळ्याच्या ठिकाणी पोहोचणार आहे. सर्व संघ आपल्या अधिकृत गणवेशात आणि विद्यापीठ ध्वजासह या समारंभात सहभागी होणार असून, हा कार्यक्रम राष्ट्रीय एकात्मता, क्रीडासंस्कृती आणि युवाऊर्जेचे प्रतीक ठरणार आहे. या वैशिष्ट्यपूर्ण चॅम्पियनशिप बॅटन सेरेमनीमध्ये बॅटन मिरविण्यासाठी प्रत्येक राज्यातून एका कर्णधाराची निवड लॉटद्वारे करण्यात येणार आहे. निवडलेले कर्णधार बॅटन हातात घेऊन पुढे देत राष्ट्रीय क्रीडाऐक्याचे प्रतीकात्मक दर्शन घडवतील. ही मिरवणूक बॅटन लाइटिंग सेरेमनीने क्रीडांगणावर संपन्न होणार आहे.
या राष्ट्रीय स्पर्धेतील पुरुष गटाच्या अखिल भारतीय आंतर-विद्यापीठ सॉफ्टबॉल अजिंक्यपद स्पर्धेचे उद्घाटन दिनांक १ फेब्रुवारी २०२६ सायंकाळी ४.०० वाजता श्री शिवाजी विज्ञान महाविद्यालय, अमरावतीच्या सुसज्ज क्रीडांगणावर आयोजित करण्यात आले आहे. याच पद्धतीने महिला स्पर्धेचे देखील ग्रँड ओपनिंग सेरेमनी व चॅम्पियनशिप बॅटन प्रोसेशन दिनांक ६ फेब्रुवारी २०२६ रोजी दुपारी ४.०० वाजता पार पडणार आहे.
स्पर्धेचे व्यवस्थापन व महत्त्व
संपूर्ण स्पर्धा आंतरराष्ट्रीय सॉफ्टबॉल नियमांनुसार तसेच सॉफ्टबॉल असोसिएशन ऑफ इंडिया आणि अखिल भारतीय विद्यापीठ संघ (AIU) यांच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार आयोजित करण्यात येणार असून, पुरुष व महिला गटांतील सामने दररोज सकाळी ७.३० ते सायंकाळी ६.०० या वेळेत खेळविण्यात येणार आहेत.
ही स्पर्धा केवळ क्रीडास्पर्धा नसून, अमरावती शहराची राष्ट्रीय क्रीडा ओळख, महाविद्यालयीन तसेच विद्यापीठीय क्रीडाविकास, क्रीडासंस्कृतीचा प्रसार, तसेच युवकांच्या शैक्षणिक-क्रीडात्मक विकासाला चालना देणारा एक राष्ट्रीय क्रीडा महोत्सव ठरणार आहे. श्री शिवाजी विज्ञान महाविद्यालयाच्या मुख्य क्रीडांगणासोबतच मातोश्री विमलाबाई देशमुख महाविद्यालय, श्री शिवाजी शारीरिक शिक्षण महाविद्यालय, श्री शिवाजी उद्यानविद्या महाविद्यालय, डॉ पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालय या पाच मैदानांवर सामने पार पडणार आहेत.
मान्यवरांची उपस्थिती:
अखिल भारतीय आंतर-विद्यापीठ सॉफ्टबॉल अजिंक्यपद स्पर्धेचा प्रारंभ भव्य आणि दिमाखदार उद्घाटन सोहळ्याने होणार आहे. पुरुष गटासाठी हा उद्घाटन सोहळा १ फेब्रुवारी २०२६ रोजी सायंकाळी ४.०० वाजता, तर महिला गटासाठी ६ फेब्रुवारी २०२६ रोजी सायंकाळी ४.०० वाजता श्री शिवाजी विज्ञान महाविद्यालय, अमरावती येथील क्रीडांगणावर पार पडणार आहे.
या दोनही स्पर्धांच्या उद्घाटन समारंभाच्या अध्यक्षस्थानी मा. डॉ. मिलिंद बारहाते, कुलगुरू, संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ, अमरावती हे राहणार असून, उद्घाटक म्हणून मा. श्री हर्षवर्धन देशमुख, अध्यक्ष, श्री शिवाजी शिक्षण संस्था, अमरावती तसेच प्रमुख पाहुणे म्हणून मा. डॉ. महेंद्र ढोरे, प्र-कुलगुरू, संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ, अमरावती हे उपस्थित राहणार आहेत. संपूर्ण स्पर्धा आयोजनाच्या कार्यकारी अध्यक्षपदाची जबाबदारी मा. श्री दिलीपबाबू इंगोले, खजिनदार, श्री शिवाजी शिक्षण संस्था, अमरावती यांनी अत्यंत समर्थपणे सांभाळली असून हे आयोजन देशभरात या स्पर्धांच्या आयोजनात एकमेवाद्वितीय ठरावे यासाठी एक महिन्यापासून अखंडित प्रयत्न करीत आहेत.
पुरुष गटाच्या उद्घाटन समारंभास विशेष अतिथी म्हणून मा. श्री. राकेश ओला, पोलीस आयुक्त, अमरावती हे उपस्थित राहणार आहेत. तर समारोप आणि बक्षिस वितरण समारंभासाठी मा. श्री. प्रदीप तळवेलकर, सचिव महाराष्ट्र सॉफ्टबॉल असोसिएशन आणि पोलीस उपयुक्त मा. श्री. गणेश शिंदे उपस्थित राहणार आहेत. यानिमित्ताने श्री शिवाजी शिक्षण संस्थेच्या कार्यकारी परिषदेचे तसेच विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे सर्व सन्माननीय सदस्य या कार्यक्रमाची शोभा वाढविणार आहेत.
या राष्ट्रीय स्पर्धेच्या आयोजनासाठी संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ, अमरावती यांचे कुलसचिव डॉ. अविनाश असनारे, श्री शिवाजी विज्ञान महाविद्यालय, अमरावतीचे प्राचार्य डॉ. जी. व्ही. कोरपे, संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाच्या क्रीडा व शारीरिक शिक्षण मंडळाच्या प्रभारी संचालक तथा आयोजन सचिव डॉ. तनुजा राऊत आणि अखिल भारतीय आंतर-विद्यापीठ सॉफ्टबॉल स्पर्धा २०२५–२६ च्या समन्वयक डॉ. रुपाली इंगोले यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. पत्रकार परिषदेसाठी श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे कोषाध्यक्ष मा. श्री दिलीबाबू इंगोले, प्राचार्य डॉ. जी. व्ही कोरपे, प्रा. डॉ. तनुजा राऊत, प्राचार्य डॉ सुभाष गावंडे, विद्यापिठाचे जनसंपर्क अधिकारी डॉ. विलास नांदुरकर, प्राचार्य डॉ वर्षाताई देशमुख, प्राचार्य डॉ विनय राऊत, प्राचार्य श्री चंद्रशेखर देशमुख यांच्यासोबत डॉ. संगीता इंगोले, डॉ. रुपाली इंगोले आदी मान्यवर उपस्थित होते.



