२६ जानेवारी – पोलीस मुख्यालय मैदानात ध्वजारोहण, प्रजासत्ताक दिनाची तयारी पूर्ण, शहर सज्ज

अमरावती : प्रजासत्ताक दिनानिमित्त शहरात भव्य ध्वजारोहण सोहळ्याची तयारी पूर्ण झाली आहे. यंदा जिल्हा स्टेडियमऐवजी पोलीस मुख्यालय मैदानात ध्वजारोहण होणार असून, त्यासाठी प्रशासनाकडून सर्व तयारी पूर्ण करण्यात आली आहे.
२६ जानेवारी प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर शहरातील पोलीस मुख्यालय मैदानात जोरदार तयारी सुरू असून आता ती पूर्णत्वास आली आहे. दरवर्षी २६ जानेवारी रोजी होणारे ध्वजारोहण जिल्हा स्टेडियम येथे आयोजित केले जाते. मात्र यावर्षी जिल्हा स्टेडियम येथे ट्रॅकचे काम सुरू असल्यामुळे हा कार्यक्रम पोलीस मुख्यालय मैदानात आयोजित करण्यात आला आहे. या ठिकाणी ध्वजारोहणासाठी मंच उभारणी, बैठक व्यवस्था, ध्वनी यंत्रणा, सुरक्षाव्यवस्था आणि सजावटीची कामे पूर्ण करण्यात आली आहेत. पोलीस प्रशासन, महापालिका आणि विविध विभागांच्या समन्वयातून कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले असून नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून राष्ट्रीय उत्सवात सहभागी व्हावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. उद्या सकाळी ध्वजारोहणानंतर परेड, सांस्कृतिक कार्यक्रम आणि विविध प्रात्यक्षिकांचे आयोजन करण्यात आले आहे.



