बडनेरा : ‘लोकशाची युगयात्रा’ ग्रंथाचा प्रकाशन सोहळा मोठ्या उत्साहात

बडनेरा येथे शनिवार, २४ जानेवारी २०२६ रोजी ‘लोकशाची युगयात्रा’ या ग्रंथाचा प्रकाशन सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. सार्वजनिक सभागृहात आयोजित या कार्यक्रमाला विचारवंत, साहित्यिक, सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिकांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती होती. या ग्रंथाचे लेखक आयु. प्रकाश खडसे असून, ग्रंथाचे प्रकाशन भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष भदंत डॉ. धम्मशीलजी नागसेन यांच्या शुभहस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ साहित्यिक आयु. इ. मो. नारनवरे हे होते. कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून आयु. विजयकुमार चौरागार, प्रा. डॉ. रविंद्र मुंडे आणि आयु. दिलीपभाऊ एटकर यांनी उपस्थित राहून ग्रंथातील वैचारिक भूमिका, सामाजिक न्याय आणि लोकशाही मूल्यांवर आधारित आशयाचे कौतुक केले. विशेष अतिथी म्हणून इंजि. विवेक जनार्दन मवाडे, कृष्णाजी बोरकर आणि चंदाताई दामू इंगळे-तायडे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी महानगरपालिका माजी सभापती प्रकाश बनसोड यांचा सत्कार करण्यात आला. ‘लोकशाची युगयात्रा’ हा ग्रंथ सामाजिक न्याय, लोकशाही मूल्ये आणि परिवर्तनवादी विचारांचा सखोल आढावा घेणारा असून, समाजासाठी दिशादर्शक ठरेल, असे मत यावेळी वक्त्यांनी व्यक्त केले. कार्यक्रमाचे आयोजन सार्वजनिक सिद्धार्थ वाचनालय, बडनेरा यांच्या वतीने करण्यात आले होते. सूत्रसंचालन आणि आभारप्रदर्शन यशस्वीरीत्या पार पडले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी आयोजकांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले.



