पुण्यात पुन्हा हिट अँड रनची धक्कादायक घटना; मॉर्निंग वॉकला गेलेल्या ७३ वर्षीय महिलेचा मृत्यू

पुणे शहरात अपघातांची मालिका थांबण्याचं नाव घेत नसताना, पुन्हा एकदा हिट अँड रनची गंभीर घटना समोर आली आहे. पाषाण रस्त्यावरील एनसीएल (NCL) इन्स्टिट्यूटसमोर भर पहाटे झालेल्या या अपघातात मॉर्निंग वॉकसाठी घराबाहेर पडलेल्या ७३ वर्षीय ज्येष्ठ महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
आशा पाटील असं मृत महिलेचं नाव असून त्या रोजच्या सवयीप्रमाणे सकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास फिरायला गेल्या होत्या. याच वेळी त्यांच्या पाठीमागून भरधाव वेगात आलेल्या एका चारचाकी वाहनाने त्यांना जोरदार धडक दिली. धडकेमुळे आशा पाटील यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा करण्यात आला असून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. तसेच या घटनेची माहिती महिलेच्या कुटुंबियांनाही देण्यात आली आहे.
दरम्यान, अपघात घडवून संबंधित कार चालक घटनास्थळी न थांबता फरार झाला. पोलिसांकडून सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपी चालकाचा शोध सुरू आहे. पुण्यात दिवसेंदिवस वाढत असलेल्या रस्ते अपघातांमुळे नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला असून, प्रशासनाच्या कार्यपद्धतीवरही पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे.



