BeedLatest News

Beed : सोनोग्राफीसाठी आलेल्या वयोवृद्ध आजीला दरवाजासमोर झोपावलं, सेंटर बंद करून कर्मचारी गेले; बीडमधील संतापजनक प्रकार

बीड : जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी आलेल्या वयोवृद्ध आजारी रुग्णाला उर्मटपणाची वागणूक देत चक्क सोनोग्राफी सेंटरचे दार लावून गेल्याचा प्रकार समोर आला आहे. याचा व्हिडीओही समाज माध्यमावर व्हायरल झाला असून या प्रकारावर संताप व्यक्त केला जात आहे. जिल्हा रुग्णालयातील कर्मचारी अगोदरच वेळा पाळत नसल्यामुळे रुग्णांमध्ये संताप आहे. त्यातच बुधवारी घडलेल्या प्रकारामुळे जिल्हा रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना माणुसकी हरवली आहे का असा सवाल उपस्थित केला जात आहे. तसेच संबंधित कर्मचाऱ्यावर कारवाई करावी अशी मागणी होते आहे.

सोनोग्राफी करण्यासाठी गेलेल्या वयोवृद्ध पेशंट आजी तिसऱ्या मजल्यावर अॅडमिट होत्या. त्यांना डॉक्टरांनी सोनोग्राफी करण्यास सांगितले. जिल्हा रुग्णालयातील लिफ्ट बंद असल्यामुळे तिसऱ्या मजल्यावरून काही सामाजिक कार्यकर्त्यांनी त्यांना उचलून खाली आणले. 

सेंटरचा दरवाजा बंद करून कर्मचारी गेले

त्या वयोवृद्ध आजी सहा वाजण्यापूर्वीच सोनोग्राफी सेंटरसमोर आल्या. मात्र, सोनोग्राफी सेंटर मधील महिला कर्मचाऱ्याने पावणे सहा वाजताच दरवाजा बंद केला. समोर ती वयोवृद्ध महिला खाली झोपली असतानाही तिच्याकडे लक्ष न देता सोनोग्राफीचा दरवाजा बंद केला गेला.

त्यावर जाब विचारला असता त्या कर्मचाऱ्याकडून आजीच्या नातेवाईकांशी उर्मटपणाची भाषा करण्यात आली. समोर आजी असतानाही दरवाजा बंद करून ती महिला निघून गेली. या घटनेचा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत असून त्यामुळे बीड जिल्हा रुग्णालयातील कामकाजावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

दरम्यान, या प्रकरणात आपण चौकशी केली असून कर्तव्यात कसूर करणाऱ्या परिचारिकेसह डॉक्टरची चौकशी करून कारवाई केली जाईल अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक सतीशकुमार सोळंके यांनी दिली.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button