लातूरमध्ये आईची क्रूरता: पती उशिरा आल्याच्या रागातून दीड वर्षांच्या चिमुकलीची हत्या

लातूर शहरातून मन सुन्न करणारी आणि समाजाला हादरवून टाकणारी घटना समोर आली आहे. पती कामावरून घरी येण्यास उशीर झाल्याच्या क्षुल्लक कारणावरून संतापलेल्या जन्मदात्री आईने आपल्या दीड वर्षांच्या निष्पाप मुलीची चाकूने निर्घृण हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी महिलेला अटक केली असून एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही घटना लातूर शहरातील एमआयडीसी परिसरातील श्याम नगर भागात सोमवारी, १९ जानेवारी २०२६ रोजी पहाटेच्या सुमारास घडली. मिळालेल्या माहितीनुसार, विक्रम जगन्नाथ चौगुले (वय ३४) हे मजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. त्या दिवशी ते कामावर गेले असता घरी परतण्यास काहीसा उशीर झाला. याच कारणावरून त्यांची पत्नी अश्विनी विक्रम चौगुले (वय ३०) हिचा राग अनावर झाला.
रागाच्या भरात अश्विनीने घरातील धारदार चाकू घेतला आणि आपल्या दीड वर्षांच्या चिमुकल्या मुलीवर अत्यंत क्रूरपणे हल्ला केला. तिने मुलीच्या तोंडावर, पोटावर, छातीवर, कमरेवर, डोक्यावर तसेच गुप्तांगावर सपासप वार केल्याची माहिती समोर आली आहे. या भीषण हल्ल्यात मुलगी गंभीर जखमी होऊन जागीच मृत्युमुखी पडली.
विक्रम चौगुले घरी परतल्यानंतर त्यांना हा धक्कादायक प्रकार समजला. त्यांनी तात्काळ एमआयडीसी पोलीस ठाण्यात धाव घेऊन पत्नीविरुद्ध तक्रार दाखल केली. पोलिसांनी आरोपी अश्विनी हिच्याविरुद्ध गुन्हा नोंदवून तिला अटक केली असून पुढील तपास सुरू आहे.
या अमानुष घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. रागावर नियंत्रण न ठेवल्यास त्याचे किती गंभीर आणि भयावह परिणाम होऊ शकतात, याचे हे विदारक उदाहरण असल्याची भावना नागरिकांमध्ये व्यक्त होत आहे.



