बोरी खुर्दमध्ये ५०० रुपयांच्या नकली नोटा छापणाऱ्या कारखान्याचा पर्दाफाश; दोन आरोपींना अटक

यवतमाळ/पुसद: जिल्ह्यात बनावट नोटांचे जाळे पसरवणाऱ्या टोळीला पुसद शहर पोलिसांनी मोठा दणका दिला आहे. बोरी खुर्द येथील एका घरात ५०० रुपयांच्या नकली नोटा छापल्या जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला असून, पोलिसांनी धाड टाकून दोन आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. या कारवाईत प्रिंटर आणि बनावट नोटांसह मोठ्या प्रमाणात साहित्य जप्त करण्यात आले आहे.
गुप्त माहितीवरून पोलिसांची ‘सर्जिकल स्ट्राईक’
बोरी खुर्द येथील एका घरात ५०० रुपयांच्या नोटांचे स्कॅनिंग आणि प्रिंटिंग करून त्या बाजारात चलनात आणण्याची तयारी सुरू असल्याची गुप्त माहिती पुसद शहर पोलिसांना मिळाली होती. या माहितीची गांभीर्याने दखल घेत, उपविभागीय पोलीस अधिकारी हर्षवर्धन बिजे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि ठाणेदार सेवानंद वानखेडे यांच्या नेतृत्वात पोलिसांनी शनिवारी (१७ जानेवारी) सायंकाळी बोरी खुर्द येथे अचानक छापा टाकला.
अशा छापल्या जात होत्या नोटा
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी संतोष सूर्यवंशी (रा. हिंगोली) आणि गणेश गायकवाड (रा. पुसद) हे विनोद केरबाजी कुरडे याच्या घरी प्रिंटरच्या साहाय्याने ५०० रुपयांच्या नकली नोटा छापत होते. तपासात आतापर्यंत सुमारे १५ नकली नोटा छापण्यात आल्याचे उघड झाले आहे. पोलिसांनी घटनास्थळावरून खालील साहित्य जप्त केले आहे:
- ५०० रुपयांच्या १५ नकली नोटा
- ५०० रुपयांच्या ४ ओरिजनल नोटा (नमुन्यासाठी वापरलेल्या)
- कलर प्रिंटर, केमिकल, कोरे कागद, कटर आणि पॅड.
दोन अटकेत, मुख्य आरोपी फरार
या प्रकरणी पोलिसांनी संतोष सूर्यवंशी आणि गणेश गायकवाड या दोघांना अटक केली असून, घराचा मालक आणि या प्रकरणातील तिसरा आरोपी विनोद केरबाजी कुरडे हा पोलिसांची चाहुल लागताच फरार झाला आहे. पोलिसांनी याप्रकरणी भादंविच्या संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल केला असून फरार आरोपीचा शोध सुरू आहे.
कारवाईत सहभागी टीम
ही यशस्वी कारवाई एपीआय प्रेम केदार, पोहेकॉ सुनील मदने, पंकज पातुरकर, शंकर टाळीकोटे, एनपीसी खुशाल चव्हाण, पीसी जुनैद सय्यद आणि दिनेश सोळंके यांनी केली. या कारवाईमुळे बनावट नोटा चलनात आणणाऱ्या टोळीचे धाबे दणाणले आहेत.



