AmravatiLatest NewsSocial News

विद्यापीठातील समाजशास्त्र विभागात राजमाता मॉ जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती साजरी

अमरावती :  संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठातील समाजशास्त्र विभागात राजमाता मॉ जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांची जयंती (युवक दिन) उत्साहात साजरी करण्यात आली. यानिमित्ताने विभागाच्यावतीने जेन-जी (नवीन पिढी) या विषयावर वादविवाद स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विभागप्रमुख डॉ. के.बी. नायक, तर डॉ. के. यू. राऊत यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
               स्वामी विवेकानंद यांच्या विचारांतून युवकांनी आत्मविश्वास, चारित्र्य, राष्ट्रभक्ती आणि सामाजिक बांधिलकी जपण्याचा संदेश देण्यात आला. यावेळी संशोधक विद्यार्थी रमेश पवार याने राष्ट्रमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या कार्याचा आढावा घेतला. प्रा. साधना इंगोले यांनी राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या कार्याचा उल्लेख करताना सावित्रीबाई फुले, रमाबाई आंबेडकर, पंडिता रमाबाई, अहिल्याबाई होळकर यांसारख्या समाजसुधारक महिलांनी समाज परिवर्तनात बजावलेल्या महत्त्वपूर्ण भूमिकेवर प्रकाश टाकला.
                वादविवाद स्पर्धेत एम.ए. भाग 2 ची विद्यार्थीनी कु. गायत्री खरबडे हिने जेन-झेड पिढीची सकारात्मक बाजू मांडताना ही पिढी तंत्रज्ञानस्नेही, जागरुक, नवविचार व बदल स्वीकारणारी असल्याचे नमूद केले. एम.ए.भाग-1 ची विद्यार्थीनी कु. निर्मल काळे हिने जेन-झेड च्या नकारात्मक बाजू मांडताना सोशल मीडियावर अवलंबित्व, ताणतणाव, संयमाचा अभाव व पारंपरिक मूल्यांपासून दुरावा यावर भाष्य केले.
                 अध्यक्षीय भाषणात डॉ. के. बी. नायक म्हणाले, जेन-झेड ही संधी आणि आव्हाने घेऊन आलेली पिढी असून योग्य मार्गदर्शन, मूल्यशिक्षण व विवेकनिष्ठ विचारांची जोड दिल्यास ही पिढी समाजपरिवर्तनात मोलाची भूमिका बजावू शकते. राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या विचारांचा वारसा युवकांनी आत्मसात करावा, असे आवाहन त्यांनी केले. संचालन डॉ. प्रशांत भगत, तर आभार कु. गायत्री खरबडे मानले. कार्यक्रमाला डॉ.रोहिणी देशमुख, प्रा.साधना इंगोले, प्रा. सुनिता इंगळे, डॉ.रोहिणी वावरे, रमेश पवार,  गोपाल वानखडे, प्रवीण घर्डीनकर, विद्यार्थी मोठ¬ा संख्येने उपस्थित होते.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button