अमरावतीच्या विकासासाठी भाजपच योग्य पर्याय – प्रणित सोनी

अमरावती
अमरावती शहराच्या सर्वांगीण विकासासाठी भारतीय जनता पार्टी हाच योग्य पर्याय असल्याचा ठाम विश्वास भाजप नेते प्रणित सोनी यांनी व्यक्त केला. प्रभाग क्रमांक १३ मध्ये आयोजित बैठकीदरम्यान त्यांनी भाजपाच्या सर्व उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन नागरिकांना केले.
प्रणित सोनी म्हणाले की, २०१७ पासून अमरावती शहरातील विकासकामांना भाजपाने सातत्याने प्राधान्य दिले आहे. आंबापेठ प्रभागासह शहरातील विविध भागांत रस्ते, पाणीपुरवठा, स्वच्छता आणि मूलभूत सुविधांवर भर देण्यात आला असून, पुढील काळातही हा विकासाचा वेग कायम ठेवला जाईल, असा दावा त्यांनी केला.
महापालिकेत भाजपाची सत्ता आल्यास शहरातील सुरक्षिततेसाठी मोठ्या प्रमाणात सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात येतील, तसेच नागरिकांना २४ तास पाणीपुरवठा उपलब्ध करून देण्याचा संकल्प भाजपाचा असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. स्वच्छ अमरावतीसाठी भाजपाचे नगरसेवक एकत्रितपणे काम करतील, असेही त्यांनी सांगितले.
प्रभाग क्रमांक १३ मध्ये भाजपाचा ठोस विकासाचा अजेंडा असून, नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी पक्ष कटिबद्ध असल्याचे प्रणित सोनी यांनी नमूद केले. अमरावती शहर सुरक्षित, स्वच्छ आणि विकसित करण्याचा निर्धार भाजपाने केला असून, येणाऱ्या महापालिका निवडणुकीत नागरिकांनी भाजपाला संधी द्यावी, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.



