मराठी पत्रकार दिनानिमित्त बोरगाव धांदे येथे सामाजिक बांधिलकीचा प्रेरणादायी उपक्रम

बोरगाव धांदे
६ जानेवारी मराठी पत्रकार दिनानिमित्त पत्रकारितेच्या सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडवणारा एक प्रेरणादायी उपक्रम बोरगाव धांदे येथे पार पडला. पत्रकार दिन केवळ शुभेच्छांपुरता मर्यादित न ठेवता समाजातील उपेक्षित घटकांसाठी तो साजरा करण्याचा संदेश या उपक्रमातून देण्यात आला.
६ जानेवारी रोजी मराठी पत्रकार दिनाचे औचित्य साधून बोरगाव धांदे येथील मातोश्री वृद्धाश्रमात विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. मराठी पत्रकारितेचे जनक बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यानंतर वृद्धाश्रमातील ज्येष्ठ नागरिकांना थंडीपासून संरक्षण मिळावे यासाठी ब्लॅंकेटचे वाटप करण्यात आले. तसेच सर्व वृद्धांसाठी खास पुरणपोळीचे स्नेहभोजन आयोजित करण्यात आले होते.
हा उपक्रम अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाचे तालुका उपाध्यक्ष संतोष वाघमारे, महिला मुक्ती मोर्चा संघटना आणि संघटित युवा पत्रकार संघ यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आयुष भारत डॉक्टर असोसिएशनचे विदर्भ अध्यक्ष डॉ. विनोद देशमुख हे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून धामणगाव विधानसभा क्षेत्राचे निवडणूक प्रमुख रावसाहेब रोठे उपस्थित होते.
यावेळी महिला मुक्ती मोर्चाचे अध्यक्ष अशोकभाऊ खरात, जिल्हाध्यक्ष संगीताताई इंगळे यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभली. कार्यक्रमादरम्यान महिला मुक्ती मोर्चाच्या नवीन पदाधिकाऱ्यांची नियुक्तीही करण्यात आली.
वृद्धांच्या चेहऱ्यावर उमटलेले समाधानाचे भाव पाहून उपस्थितांनी समाधान व्यक्त केले. सामाजिक बांधिलकी जपत साजरा करण्यात आलेला हा मराठी पत्रकार दिन उपस्थितांच्या मनात विशेष ठसा उमटवून गेला.



