चिंचखेड येथे श्री पंचवतार उपहार महोत्सव भक्तिभावात संपन्न; गोसंवर्धन व सेवाभावाचा संदेश

अमरावती
अमरावती जिल्ह्यातील चिंचखेड येथे श्री पंचकृष्ण गोरक्षण व चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने आयोजित श्री पंचवतार उपहार महोत्सव व अभिष्टचिंतन समारंभ मोठ्या भक्तिभावात आणि उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाच्या माध्यमातून गोसंवर्धन, सेवा आणि सदाचाराचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले.
चिंचखेड येथील ट्रस्टच्या प्रांगणात पार पडलेल्या या कार्यक्रमात सर्वत्र भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प.पू.प.म. श्री बिडकर बाबा होते, तर सत्कारमूर्ती म्हणून अखिल भारतीय महानुभाव परिषदचे अध्यक्ष प.पू.प.म. श्री करंजकर बाबा उपस्थित होते. यावेळी प.पू.प.म. श्री पुसदेकर बाबा यांचीही प्रमुख उपस्थिती लाभली.
कार्यक्रमाचे उद्घाटन व मार्गदर्शन प.पू.प.म. श्री करंजकर बाबा यांच्या शुभहस्ते करण्यात आले. यावेळी मान्यवरांच्या हस्ते अभिष्टचिंतन, सत्कार तसेच धार्मिक विधी संपन्न झाले. संत-महंतांनी आपल्या प्रवचनातून गोसंवर्धन, सेवा, सदाचार आणि भक्तीचे महत्त्व उपस्थित भाविकांना पटवून दिले.
या कार्यक्रमाला समाजसेवक चंद्रकुमार उर्फ लप्पीभैया जाजोदिया यांच्यासह सामाजिक, धार्मिक व राजकीय क्षेत्रातील अनेक मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. पंचवतार उपहार महोत्सवाचा लाभ घेण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती.
समारोपप्रसंगी प.पू.प.म. श्री करंजकर महाराजांनी आयोजक आणि उपस्थित भाविकांचे आभार मानले तसेच लप्पीभैया जाजोदिया यांना गोसेवा अखंडपणे सुरू ठेवण्याचे आशीर्वाद दिले.



