विद्यापीठाच्यावतीने महानुभाव साहित्यातील वेचे वाचन व आकलन विषयावर तीनदिवसीय कार्यशाळेचे आयोजन

अमरावती – (दि. 05.01.2026) : मराठी भाषा पंधरवाडा निमित्ताने संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठातील महानुभाव अध्यासन केंद्र, श्रीमती नरसम्मा कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, अमरावती, इंदिराबाई मेघे महिला महाविद्यालय, अमरावती, नारायणराव राणा महाविद्यालय, बडनेरा आणि कला व विज्ञान महाविद्यालय, कुहा यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 6 जानेवारी ते 8 जानेवारी, 2026 दरम्यान ‘महानुभाव साहित्यातील वेचे वाचन व आकलन’ या विषयावर तीनदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.
दिनांक 6 जानेवारी, 2026 रोजी दुपारी 12.30 वाजता प्रथम सत्राचे आयोजन इंदिराबाई मेघे महिला महाविद्यालय, याठिकाणी करण्यात आले असून सत्राचे अध्यक्षस्थान प्राचार्य डॉ. अजय कोल्हे भूषवतील. सत्राला प्रमुख अतिथी म्हणून प्राचार्य डॉ. गोपाल वैराळे व डॉ. पूनम चौधरी उपस्थित राहणार असून विद्यापीठ महानुभाव अध्यासन केंद्रप्रमुख डॉ. महंत सोनपेठकर याप्रसंगी मार्गदर्शन करतील.
दिनांक 7 जानेवारी, 2026 रोजी सकाळी 11.00 वाजता द्वितीय सत्राचे आयोजन श्रीमती नरसम्मा महाविद्यालय, अमरावती याठिकाणी करण्यात आले आहे. सत्राचे अध्यक्षस्थान प्राचार्य डॉ. राजेश चंदनपाट भूषविणार असून महात्मा फुले महाविद्यालय, भातकुलीचे मराठी विभागप्रमुख डॉ. रविंद्र साखरकर याप्रसंगी मार्गदर्शन करतील.
दिनांक 8 जानेवारी, 2026 रोजी दुपारी 1.00 वाजता तृतीय सत्राचे आयोजन कला व विज्ञान महाविद्यालय, कुहा, ता. तिवसा याठिकाणी करण्यात आले आहे. सत्राचे अध्यक्षस्थान प्राचार्य डॉ. अजय अभ्यंकर भूषविणार असून नारायणराव राणा महाविद्यालय, बडनेराच्या मराठी विभागप्रमुख डॉ. कल्पना मेहरे याप्रसंगी मार्गदर्शन करतील.
श्रीमती नरसम्मा महाविद्यालय, अमरावतीचे डॉ. अण्णा वैद्य, डॉ. पंकज वानखडे, इंदिराबाई मेघे महिला महाविद्यालय, अमरावतीच्या डॉ. वंदना भोयर व कला व विज्ञान महाविद्यालय, कुहाच्या डॉ. निशा नायगावकर हे आयोजित तीन दिवसीय कार्यशाळेचे आयोजक म्हणून काम पाहतील. तरी कार्यशाळेला जास्तीतजास्त संख्येने उपस्थित रहावे, असे विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. अविनाश असनारे व महानुभाव अध्यासन केंद्राचे प्रमुख डॉ. महंत सोनपेठकर यांनी आवाहन केले आहे.



