नागपूर शहर गुन्हे शाखा युनिट–3 ची मोठी कारवाई

दोन गंभीर गुन्ह्यांचा छडा; ३ आरोपी ताब्यात, साडेसात लाखांचा मुद्देमाल जप्त
नागपूर :
नागपूर शहर गुन्हे शाखेच्या युनिट–3 पथकाने आज प्रभावी कारवाई करत खापरखेडा व यशोधरानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दोन गंभीर गुन्ह्यांचा यशस्वीपणे छडा लावला आहे. या कारवाईत तीन आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्याकडून सुमारे ७ लाख ४० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
खापरखेडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत दाखल अप.क्र. 760/25 हा गुन्हा भारतीय न्याय संहिता कलम 305(अ), 331(3) व 331(4) अंतर्गत नोंदवण्यात आला होता. तसेच यशोधरानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत अप.क्र. 922/25 हा गुन्हा भारतीय न्याय संहिता कलम 303(2) अंतर्गत दाखल होता.
या दोन्ही प्रकरणांचा तपास करत गुन्हे शाखा युनिट–3 पथकाने
सक्षम उर्फ बोडा प्रेमनाथ मौदेकर (वय 23),
ध्रुव राजेश बिरबल (वय 19)
तसेच एक विधी संघर्षग्रस्त बालक
यांना ताब्यात घेतले आहे.
आरोपींकडून ५ ग्रॅम सोन्याची अंगठी, ५ तोळे सोन्याची लगड व एक ॲक्टिवा दुचाकी असा एकूण अंदाजे ७ लाख ४० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
ताब्यात घेतलेल्या आरोपींची वैद्यकीय तपासणी करून, जप्त मुद्देमालासह पुढील कारवाईसाठी त्यांना पोलीस ठाणे खापरखेडा येथे हजर करण्यात आले आहे. तसेच नमूद आरोपींची संपूर्ण माहिती सिम्बा ॲपमध्ये नोंदवण्यात आली असल्याची माहिती पोलीस प्रशासनाने दिली आहे.
गुन्हे शाखा युनिट–3 च्या या कारवाईमुळे शहरातील गुन्हेगारीवर आळा बसण्यास मदत होणार असल्याचे बोलले जात आहे.



