Latest NewsSocial News

वाघोड येथील जि.प. शाळेत बालआनंद मेळावा; विद्यार्थ्यांकडून प्रत्यक्ष खरेदी-विक्रीतून व्यवहारज्ञानाचे धडे

वाघोड :

वाघोड येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेत शिक्षणाला व्यवहाराची जोड देणारा एक आगळा-वेगळा उपक्रम राबविण्यात आला. येथे आयोजित करण्यात आलेल्या बालआनंद मेळाव्यात विद्यार्थ्यांनी थेट खाद्यपदार्थांची विक्री करत प्रत्यक्ष अनुभवातून व्यवहारज्ञानाचे धडे घेतले. या मेळाव्यात एकूण ४१५० रुपयांची उलाढाल झाली असून, पालक व ग्रामस्थांनी या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

शुक्रवारी आयोजित करण्यात आलेल्या या बालआनंद मेळाव्यात विद्यार्थ्यांनी पाणीपुरी, भेळ, पोंगे, शेंगदाण्याचे लाडू, इडली, आप्पे, खमन, ओली भेळ, गाजर हलवा, गुलाबजामुन, पावभाजी, कचोरी, चणे उसळ, पोहे, पापड, पेरू, गुळातील बोरे आदी विविध पदार्थांचे एकूण २० स्टॉल्स उभारले होते. विद्यार्थ्यांनी तयार करून आणलेले सर्वच पदार्थ विक्रीस गेले.

या बालआनंद मेळाव्याचे उद्घाटन थोरगव्हाण केंद्र प्रमुख हरिश्चंद्र बोंडे, वाघोड केंद्र प्रमुख प्रतिभा बडगुजर, कुँवरस्वामी फाउंडेशनचे अध्यक्ष प्रमोद चौधरी, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष संतोष चौधरी तसेच दिव्य मराठीचे पत्रकार दिलीप महाजन यांच्या हस्ते क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन व फीत कापून करण्यात आले.

विद्यार्थ्यांना दैनंदिन जीवनातील व्यवहार, पैशांची देवाण-घेवाण तसेच खरेदी-विक्रीचे महत्त्व प्रत्यक्ष अनुभवातून समजावून देणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश होता. मेळाव्यास पालक, ग्रामस्थ, ज्येष्ठ नागरिक, शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. शाळेच्या प्रांगणात आकर्षक रांगोळ्या, फुगे व सजावट करण्यात आली होती.

सकाळी सुरू झालेला हा मेळावा दुपारपर्यंत उत्साहात पार पडला. या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी शाळेचे मुख्याध्यापक व शिक्षकांनी विशेष परिश्रम घेतले.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button