Crime NewsLatest NewsMaharashtraNagpur

नागपूरमध्ये घरफोडी टोळीचा पर्दाफाश; दोन अटकेतून ९ गुन्हे उघड, ४.१९ लाखांचा मुद्देमाल जप्त

नागपूर :

नागपूर शहरात वाढत्या घरफोडीच्या घटनांवर गुन्हे शाखा नागपूर शहर युनिट क्रमांक ०२ ने प्रभावी कारवाई करत दोन आरोपींना अटक केली असून, त्यांच्या अटकेतून तब्बल नऊ घरफोडीचे गुन्हे उघडकीस आले आहेत. या कारवाईत पोलिसांनी ४ लाख १९ हजार ७५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

गेल्या काही महिन्यांपासून नागपूर शहर व ग्रामीण भागात घरफोडीच्या घटनांमध्ये वाढ झाली होती. या पार्श्वभूमीवर गुन्हे शाखेने मिळालेल्या विश्वासार्ह गुप्त माहितीनुसार कारवाई करत साहिल धीरज लांजेवार (वय १९) आणि ऋषिकेश उर्फ ऋषी गणेश मानकर (वय २१) या दोन आरोपींना ताब्यात घेतले.

पोलीस चौकशीत आरोपींनी नागपूर शहर तसेच नागपूर ग्रामीण भागातील मानकापूर, वाठोडा, गिट्टीखदान, बेलतरोडी आणि पारशिवनी पोलीस ठाण्यांच्या हद्दीत एकूण नऊ घरफोडीचे गुन्हे केल्याची कबुली दिली आहे.

या कारवाईत आरोपींकडून सोन्या-चांदीचे दागिने, मोबाईल फोन, दुचाकी, रोख रक्कम तसेच घरफोडीसाठी वापरलेले साहित्य असा एकूण ४ लाख १९ हजार ७५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. कारवाई दोन पंचांच्या उपस्थितीत करण्यात आली असून ई-साक्ष प्रणालीद्वारे पुरावे नोंदवण्यात आले आहेत.

अटक केलेल्या दोन्ही आरोपींची वैद्यकीय तपासणी करून कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे. दरम्यान, या गुन्ह्यात सहभागी असलेले पाच आरोपी अद्याप फरार असून त्यांचा शोध सुरू आहे. पुढील तपासासाठी आरोपी व जप्त मुद्देमाल मानकापूर पोलीस ठाण्यात सुपूर्द करण्यात आला आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button