AmravatiLatest NewsMaharashtra Politicspolitics

अमरावती मनपा निवडणूक : भाजपाचा मोठा निर्णय; तीन प्रभागांतील उमेदवारी मागे

अमरावती

अमरावती महानगरपालिका निवडणुकीत आज राजकीय घडामोडींना मोठा वेग आला. नामांकन अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी भारतीय जनता पक्षाने तीन प्रभागांमधील आपल्या उमेदवारांची उमेदवारी मागे घेतल्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. युवा स्वाभिमान पक्षासोबत ठरलेल्या मैत्रीपूर्ण लढतीच्या पार्श्वभूमीवर हा राजकीय बदल झाल्याने शहरातील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

अमरावती मनपा निवडणुकीसाठी आज नामांकन अर्ज मागे घेण्याचा अंतिम दिवस होता. याच दरम्यान भाजपाने तीन प्रभागांमधून आपल्या अधिकृत उमेदवारांची उमेदवारी रद्द केल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. संबंधित प्रभागांमध्ये युवा स्वाभिमान पक्षाचे उमेदवार आधीपासूनच निवडणूक रिंगणात असल्यामुळे भाजपाने ही माघार घेतल्याची माहिती समोर आली आहे.

फ्रेझरपुरा–रुक्मिणी नगर प्रभाग क्रमांक ११ मध्ये युवा स्वाभिमान पक्षाचे सुरज भारत चौधरी उमेदवार असल्याने भाजपाकडून शैलेश सुभाष राऊत यांची उमेदवारी अधिकृतपणे रद्द करण्यात आली आहे.
तसेच जुनी वस्ती, बडनेरा प्रभाग क्रमांक २१ मधून भाजपाचे गौरव प्रमोदराव बांते यांची उमेदवारी पक्षाकडून मागे घेण्यात आली आहे.
याशिवाय गडगडेश्वर–रवी नगर प्रभाग क्रमांक १७ मधून भाजपाच्या मृणाल तुषार चौधरी यांची उमेदवारीही रद्द करण्यात आली असून या प्रभागातून युवा स्वाभिमान पक्षाच्या प्रियंका भूषण पाटणे या उमेदवार निवडणूक रिंगणात कायम आहेत.

पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी झालेल्या बंदद्वार बैठकीनंतर भाजप आणि युवा स्वाभिमान पक्षामध्ये मैत्रीपूर्ण लढत होणार असल्याचे स्पष्ट झाले होते. त्यानंतरच भाजपाने या तीन प्रभागांमधून आपल्या उमेदवारांची उमेदवारी मागे घेतल्याचे बोलले जात आहे.

भाजपाच्या या निर्णयामुळे संबंधित उमेदवारांमध्ये नाराजीचे वातावरण असून, या निर्णयाचा अमरावती महानगरपालिका निवडणुकीच्या एकूण राजकीय समीकरणांवर मोठा परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. पुढील राजकीय हालचालींकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button