भंडाऱ्यात माणुसकीला काळीमा; मंदिर परिसरात नवजात अर्भकाचा मृतदेह आढळल्याने खळबळ

भंडाऱ्यात माणुसकीला काळीमा फासणारी अत्यंत धक्कादायक घटना समोर आली असून, राजापूर नाकाडोंगरी मार्गावरील दुर्गा मंदिर परिसरात काल पहाटेच्या सुमारास एका नवजात अर्भकाचा मृतदेह आढळून आला. देवाच्या दारी, मंदिर परिसरात निष्पाप बाळाचा असा अंत झाल्याने संपूर्ण शहरात खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
मंदिर परिसरात संशयास्पद अवस्थेत नवजात अर्भक दिसून आल्यानंतर स्थानिक नागरिकांनी तात्काळ पोलिसांना माहिती दिली. माहिती मिळताच भंडारा पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी परिसर सील करून पंचनामा केला असून, अर्भकाचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी रुग्णालयात पाठवण्यात आला आहे.
प्राथमिक तपासात अर्भक नवजात असल्याचे स्पष्ट झाले आहे. मात्र, हा मृत्यू नैसर्गिक आहे की हत्या, याचा खरा खुलासा पोस्टमार्टम अहवालानंतरच होणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.
देवाच्या दारी अशा प्रकारे नवजात बाळाचा मृतदेह आढळणे ही घटना समाजाच्या संवेदनशीलतेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी असल्याची भावना नागरिकांमध्ये व्यक्त होत आहे. या निर्दयी कृत्यामागे नेमके कोण आहे? आई-वडिलांनीच हे कृत्य केले आहे का? याचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली आहेत.
या प्रकरणी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून, दोषींवर कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा पोलिसांनी दिला आहे. या धक्कादायक घटनेमुळे भंडाऱ्यात हळहळ आणि संतापाचे वातावरण पसरले असून, निष्पाप बाळाला न्याय मिळणार का? हा प्रश्न आता संपूर्ण शहर विचारत आहे.



