धारणी तालुकास्तरीय जिल्हा परिषद प्राथमिक शालेय क्रीडा महोत्सवाचा जल्लोषात शुभारंभ

धारणी तालुक्यात आज विद्यार्थ्यांच्या उत्साहाला नवी उंची मिळाली असून, तालुकास्तरीय जिल्हा परिषद प्राथमिक शालेय क्रीडा महोत्सव २०२५–२६ चा भव्य आणि जल्लोषात शुभारंभ झाला. शिक्षण विभाग, पंचायत समिती धारणी यांच्या वतीने आयोजित या क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन माननीय आमदार केवलराम काळे यांच्या हस्ते जिल्हा परिषद हायस्कूल माध्यमिक शाळा व कनिष्ठ विज्ञान महाविद्यालय, धारणी येथील प्रशस्त मैदानावर पार पडले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी महापुरुषांच्या प्रतिमांना हारार्पण व पूजन करण्यात आले. त्यानंतर लहान विद्यार्थिनींनी सादर केलेल्या मधुर स्वागत गीताने संपूर्ण वातावरण भारावून गेले. तालुक्यातील विविध शाळांमधून सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांनी मशाल प्रज्वलन करून क्रीडा स्पर्धांचा अधिकृत शुभारंभ केला. विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग पाहून उपस्थित मान्यवरही भारावून गेले.
या कार्यक्रमाला आमदार केवलराम काळे, धारणी नगरपंचायतीचे नगराध्यक्ष सुनील चौथमल, कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा गटविकास अधिकारी विजय गायकवाड, गटशिक्षण अधिकारी गुणवंत वरघट यांच्यासह अनेक नगरसेवक, शिक्षकवर्ग, पालक व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आपल्या भाषणात आमदार केवलराम काळे म्हणाले, “विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी क्रीडा अत्यंत महत्त्वाची आहे. खेळामुळे शिस्त, संघभावना आणि नेतृत्वगुण विकसित होतात.”
कार्यक्रमादरम्यान कुसुमकोट येथील लहान विद्यार्थिनींनी सादर केलेले मनमोहक सांस्कृतिक नृत्य सर्वांचे लक्ष वेधून घेतले. विविध शाळांतील विद्यार्थ्यांच्या नृत्य व सांस्कृतिक सादरीकरणामुळे संपूर्ण परिसर उत्साहाने भरून गेला. उत्कृष्ट सादरीकरण करणाऱ्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षिसांचे वितरण करण्यात आले.
या क्रीडा महोत्सवामुळे तालुक्यातील विद्यार्थ्यांमध्ये खेळाची आवड, स्पर्धात्मक भावना आणि आत्मविश्वास वाढल्याचे चित्र स्पष्टपणे दिसून आले.



