दबाव तंत्र, बदनामी आणि चिखलदऱ्यात भाजपाचा पराभव

MTDC जमिनीच्या निर्णयामागे राजकीय नुकसान भरून काढण्याचा प्रयत्न? चर्चेला उधाण चिखलदरा येथे झालेल्या निवडणुकीनंतर भाजपाच्या पराभवावरून राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे. निवडणूक प्रक्रियेदरम्यान दबाव तंत्राचा वापर करून निर्विरोध उमेदवार निवडून आणण्याचा प्रयत्न करण्यात आला, असा आरोप स्थानिक पातळीवर सातत्याने केला जात आहे. या आरोपांमुळे भाजपाची मोठ्या प्रमाणावर बदनामी झाली असून, त्याचा थेट परिणाम निवडणूक निकालावर दिसून आल्याचे सांगितले जात आहे.
नाराजीचा फटका; मोठ्या फरकाने पराभव
परिसरात निर्माण झालेल्या तीव्र नाराजीमुळे भाजपाला चिखलदऱ्यात मोठ्या फरकाने पराभव स्वीकारावा लागला, अशी प्रतिक्रिया स्थानिक राजकीय निरीक्षक व्यक्त करत आहेत. निवडणूक काळातील वाद, दबावाचे आरोप आणि त्यातून झालेली प्रतिमा मलीनता हे पराभवाचे प्रमुख कारण ठरल्याची चर्चा आहे.
MTDC जमिनीचा निर्णय; राजकीय वेळेवर प्रश्नचिन्ह
या पराभवानंतर आणि झालेल्या बदनामीचे परिणाम कमी करण्यासाठीच, अशी चर्चा आहे की अमरावतीच्या श्री अंबादेवी संस्थानास चिखलदरा येथील महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाची (MTDC) सुमारे तीन एकर जमीन देण्याचा निर्णय पुढे आणण्यात आला.
या प्रस्तावाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली, तर महसूल मंत्री व अमरावतीचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी या निर्णयासाठी पुढाकार घेतल्याचे सांगितले जाते.
अधिकृत कारण विरुद्ध राजकीय आरोप
अधिकृत पातळीवर या निर्णयामागे धार्मिक व पर्यटन विकासाचा हेतू असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, निवडणूक काळातील वाद, दबावाचे आरोप आणि झालेली राजकीय बदनामी झाकण्यासाठीच हा निर्णय घेतला गेला का, असा प्रश्न आता उघडपणे उपस्थित केला जात आहे.
या प्रकरणावर भाजपाकडून अद्याप अधिकृत स्पष्टीकरण आलेले नसून, निर्णयाची वेळ आणि पार्श्वभूमी लक्षात घेता राजकीय हेतूंबाबत चर्चा अधिक तीव्र होत असल्याचे चित्र आहे.



