सलग सहा वेळा नगरसेविका तरी पुन्हा श्रद्धा जाधवांनाच उमेदवारी; परळचा शाखाप्रमुख मातोश्रीवर जाऊन ढसाढसा रडला

मुंबईच्या माजी महापौर आणि शिवसेनेच्या (उबाठा) ज्येष्ठ नेत्या श्रद्धा जाधव यांना पुन्हा एकदा महापालिका निवडणुकीची उमेदवारी मिळाल्याने परळ परिसरात तीव्र नाराजी उफाळून आली आहे. सलग सहा वेळा नगरसेविका असतानाही पुन्हा त्यांनाच संधी दिल्याचा आरोप करत स्थानिक शिवसैनिकांनी थेट ‘मातोश्री’समोर घोषणाबाजी केली. या आंदोलनादरम्यान शाखाप्रमुख विजय इंदुलकर यांना भावनांचा बांध फुटला आणि ते अक्षरशः रडताना दिसले.
श्रद्धा जाधव यांची राजकीय कारकीर्द
श्रद्धा जाधव यांनी १९९२ मध्ये परळ वॉर्ड क्रमांक ३६ मधून अपक्ष उमेदवार म्हणून पहिल्यांदा मुंबई महानगरपालिकेत प्रवेश केला. त्यानंतर १९९७ पर्यंत त्या सलग तीन वेळा नगरसेविका म्हणून निवडून आल्या.
१९९७ मध्ये त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आणि १९९८ मध्ये तत्कालीन महापौर नंदू साटम यांच्या ११ सदस्यीय समितीत त्यांची निवड झाली.
२००७ मध्ये त्या वॉर्ड १६९ (परळ–अँटॉप हिल) मधून पुन्हा नगरसेविका झाल्या. एकूणच १९९२ ते २०१७ या कालावधीत त्या सलग सहा वेळा नगरसेविका राहिल्या.
मुंबईच्या पाचव्या महिला महापौर
१ डिसेंबर २००९ ते ८ मार्च २०१२ या कालावधीत श्रद्धा जाधव यांनी मुंबईच्या महापौरपदाची धुरा सांभाळली. त्या मुंबईच्या पाचव्या महिला महापौर ठरल्या. शिवसेना-भाजप युतीच्या उमेदवार म्हणून त्या निवडून आल्या होत्या.
महापौर म्हणून त्यांनी उद्याने, बाजार समिती तसेच महिला व बालकल्याण समित्यांचे नेतृत्व केले. त्यांच्या कार्यकाळात मुंबईतील विविध विकासकामांवर भर देण्यात आला.
विधानसभा निवडणुकीनंतर पुन्हा सक्रिय
२०२४ च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत श्रद्धा जाधव या उबाठा गटाकडून वडाळा मतदारसंघातून उमेदवार होत्या. मात्र त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. त्यानंतर त्या पुन्हा महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सक्रिय झाल्या असून प्रभाग क्रमांक २०२ मधून त्यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
उमेदवारीला स्थानिक पातळीवर विरोध
श्रद्धा जाधव यांच्या उमेदवारीला स्थानिक शाखेतील शिवसैनिकांचा तीव्र विरोध आहे. शाखाप्रमुख विजय इंदुलकर आणि महिला शिवसैनिकांनी मातोश्रीबाहेर जोरदार घोषणाबाजी केली.
या आंदोलनादरम्यान विजय इंदुलकर यांना अश्रू अनावर झाले. “आम्ही वर्षानुवर्षे काम करतो, पण उमेदवारी नेहमी एकाच व्यक्तीला मिळते,” असा आरोप त्यांनी केला.
मातोश्रीबाहेर घोषणाबाजी, नाराजी उघड
‘मातोश्री’बाहेर शिवसैनिकांनी
“श्रद्धा जाधव हटाव”, “स्थानिकांना संधी द्या”
अशा घोषणा दिल्या.
कार्यकर्त्यांचा आरोप आहे की श्रद्धा जाधव या शाखेतही येत नाहीत आणि स्थानिक प्रश्नांकडे दुर्लक्ष करतात.
या पार्श्वभूमीवर विजय इंदुलकर पुढील निर्णय शाखेत चर्चा करून घेणार असल्याचं सांगण्यात येत आहे. काही कार्यकर्त्यांनी त्यांना अपक्ष निवडणूक लढवण्याची मागणी देखील केली आहे.
शाखाप्रमुख विजय इंदुलकर काय म्हणाले?
“प्रत्येक वेळी यांनाच निवडून आणायचं आणि तिकिट द्यायची वेळ आली की पुन्हा यांनाच. सर्वांनी निगेटिव्ह रिपोर्ट दिले होते. जर आमचं मत विचारात घ्यायचंच नसेल, तर अहवाल मागवले कशाला? आम्ही उद्धव ठाकरे साहेबांना पत्र दिलं होतं,” असं विजय इंदुलकर म्हणाले.
महिला शिवसैनिकांचाही रोष
एका महिला शिवसैनिकांनी सांगितलं,
“निष्ठावान राहून आमचा काय फायदा? साहेबांनी श्रद्धा जाधव यांना शाखेचं काम करण्यास सांगितलं होतं, पण काहीच केलं नाही. मला घर आणि नोकरीचं आश्वासन दिलं होतं, पण तेही पाळलं नाही.”
उबाठा गटासमोर अडचण?
श्रद्धा जाधव या पक्षातील अनुभवी नेत्या असल्या तरी स्थानिक पातळीवरील नाराजी आता उघडपणे समोर येत आहे. मातोश्रीसमोर घडलेलं हे नाराजीनाट्य उबाठा गटासाठी डोकेदुखी ठरणार का, याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे.
आता पक्ष नेतृत्व या नाराजीची दखल घेतं का, की श्रद्धा जाधव यांच्यावरच पुन्हा विश्वास दाखवतो, हे येत्या काही दिवसांत स्पष्ट होणार आहे.



