शेवटच्या क्षणी मोठा ट्विस्ट! उद्धव ठाकरेंना सोडून भाजपात गेलेल्या नेत्या काही दिवसांतच पक्षातून बाहेर; थेट मनसेत प्रवेश

महापालिका निवडणुकांच्या तोंडावर राज्यातील राजकारणात मोठ्या उलथापालथी पाहायला मिळत आहेत. उमेदवारी न मिळाल्याने नाराज कार्यकर्ते आणि नेते पक्ष बदलत असल्याचे चित्र सर्वत्र दिसत असताना, कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत शेवटच्या क्षणी मोठा राजकीय ट्विस्ट समोर आला आहे.
उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतून बाहेर पडून काही दिवसांपूर्वीच भारतीय जनता पार्टीत प्रवेश केलेल्या माजी नगरसेविका शितल मंढारी यांनी आता भाजपालाही रामराम ठोकत थेट मनसेमध्ये प्रवेश केला आहे. विशेष म्हणजे मनसेकडून त्यांना तात्काळ उमेदवारी देण्यात आल्याने स्थानिक राजकारणात एकच चर्चा रंगली आहे.
३० डिसेंबर ही नामांकन अर्ज भरण्याची शेवटची तारीख असल्याने सर्वच पक्षांकडून एबी फॉर्मचे वितरण करण्यात आले. मात्र यानंतर अनेक पक्षांमध्ये नाराजीचे सूर उमटले आहेत. तिकीट मिळेल या आशेवर असलेल्या अनेक कार्यकर्त्यांनी उघडपणे नाराजी व्यक्त केली असून, काही ठिकाणी इच्छुकांनी पक्ष बदलण्याचा मार्ग स्वीकारला आहे. कल्याण-डोंबिवलीत घडलेली ही घटना त्याचेच ठळक उदाहरण ठरत आहे.
उमेदवारी नाकारल्याने नाराज झालेल्या शितल मंढारी यांनी भाजप नेतृत्वावर गंभीर आरोप केले आहेत. त्यांनी सांगितले की, “आधी मी उद्धव ठाकरे यांच्या पक्षात कार्यरत होते. त्यानंतर भाजपकडून संपर्क साधण्यात आला की आमच्याकडे उमेदवार नाही, तुम्हालाच जागा दिली जाईल. या विश्वासावर मी भाजपमध्ये प्रवेश केला. मात्र महायुतीची चर्चा सुरू असतानाच भाजपने आमचा विचार न करता दुसऱ्या पक्षाला जागा दिली.”
“आम्हाला स्वतःहून बोलावून पक्षात घेतले, पण उमेदवारीच्या वेळी डावलले गेले. कार्यकर्ते, पदाधिकारी आणि समर्थकांनी केलेली मेहनत व खर्च याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करण्यात आले,” असा आरोपही त्यांनी केला.
याशिवाय भाजपवर टीका करताना शितल मंढारी म्हणाल्या की, “भाजपने ज्या प्रभागांमध्ये उमेदवार दिले आहेत, ते बहुतांश पैसेवाले उमेदवार आहेत. खऱ्या कार्यकर्त्यांचा आवाज दाबण्याचे काम सुरू आहे. युती होणार हे माहीत असतानाही बाहेरच्या उमेदवारांना पक्षात घेण्याची एवढी घाई का केली?” असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
या घडामोडींमुळे भाजपमधील अंतर्गत असंतोष पुन्हा एकदा समोर आला असून, मनसेला मात्र या प्रवेशामुळे कल्याण-डोंबिवलीत बळ मिळाल्याचे मानले जात आहे. या राजकीय घडामोडींचा आगामी महापालिका निवडणुकीवर काय परिणाम होतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.



