AmravatiCrime NewsLatest News

शासन प्रतिबंधित चायना मांज्याविरोधात अमरावती गुन्हे शाखेची मोठी कारवाई; हजारो रुपयांचा मुद्देमाल जप्त

अमरावती शहरातून पर्यावरणासह नागरिकांच्या जीवाला धोका ठरणाऱ्या शासन प्रतिबंधित चायना मांज्याविरोधात अमरावती शहर गुन्हे शाखेने मोठी कारवाई केली आहे. राजापेठ पोलीस ठाणे हद्दीतून एका इसमाला ताब्यात घेऊन हजारो रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

अमरावती शहरात सध्या मोठ्या प्रमाणात पर्यावरणास घातक आणि शासनाने प्रतिबंधित केलेल्या चायना मांज्याची बेकायदेशीर विक्री सुरू असल्याचे निदर्शनास आले होते. यामुळे पक्षी, दुचाकीस्वार आणि पादचारी यांचे प्राण धोक्यात येत असल्याने पोलीस आयुक्त राकेश ओला यांनी अशा विक्रेत्यांवर कठोर कारवाईचे आदेश दिले होते.

त्या अनुषंगाने ३० डिसेंबर २०२५ रोजी पोलीस निरीक्षक संदीप चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली अमरावती शहर गुन्हे शाखेच्या पथकाने गुप्त बातमीदाराच्या माहितीवरून बाकळेवाडी सिलांगण रोड परिसरात सापळा रचला.

या कारवाईत भूषण उर्फ पिंटू मनोहरराव चांदेकर (वय ४०, रा. बाकळेवाडी) हा इसम त्याच्या राहत्या घरासमोर शासन प्रतिबंधित चायना मांजा विक्री करताना रंगेहाथ आढळून आला. आरोपीच्या ताब्यातून मोनो फायटर KTC कंपनीच्या चायना मांजाच्या १२ चक्र्या जप्त करण्यात आल्या असून, त्याची अंदाजे किंमत १२ हजार रुपये असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

या प्रकरणी आरोपीविरुद्ध पोलीस स्टेशन राजापेठ येथे कलम ४९, २२३ बीएनएस तसेच पर्यावरण संरक्षण कायदा १९८६ चे कलम ५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अमरावती शहरात चायना मांज्यामुळे होणारे अपघात, गंभीर जखमा आणि पक्ष्यांचे मृत्यू रोखण्यासाठी अशा प्रकारच्या कारवाया पुढेही सुरू राहणार असल्याचे पोलिस प्रशासनाने स्पष्ट केले आहे.


नागरिकांनी सहकार्य करण्याचे पोलिसांचे आवाहन

शासन प्रतिबंधित चायना मांज्यामुळे अनेक निष्पाप जीव धोक्यात येत असताना अमरावती पोलिसांची ही कारवाई निश्चितच कौतुकास्पद आहे. नागरिकांनी अशा बेकायदेशीर विक्रीची माहिती तात्काळ पोलिसांना देऊन सहकार्य करावे, असे आवाहन पोलिस प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button