AmravatiLatest NewsMaharashtrapolitics

महानगरपालिका निवडणुकीसाठी भाजप ६५–६७ जागांवर मैदानात; तिकीट वाटपात नाराजी उफाळली

आगामी अमरावती महानगरपालिका निवडणुकीसाठी भारतीय जनता पार्टीकडून ६५ ते ६७ जागांवर निवडणूक लढवण्याची तयारी करण्यात आली आहे. यामध्ये मित्र पक्ष असलेल्या युवा स्वाभिमानी पक्षाला ८ ते ९ जागा देण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.

मंगळवारी सकाळी १० वाजल्यापासून भाजपचे अमरावती जिल्हा शहराध्यक्ष डॉ. नितीन धांडे यांच्या निवासस्थानी उमेदवारांना तिकीट व बी-फॉर्म वितरणाची प्रक्रिया राबवण्यात आली. ज्या उमेदवारांनी अधिकृतरीत्या आपली नामांकन पत्रे दाखल केली होती, त्यांनाच पक्षाकडून बी-फॉर्म देण्यात आले.

या वेळी माजी पालकमंत्री प्रवीण पोटे, तिवसा विधानसभा मतदारसंघाचे आमदार राजेश वानखडे, तसेच भाजपचे वरिष्ठ पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मात्र तिकीट वाटपादरम्यान काही इच्छुक उमेदवारांना बी-फॉर्म न दिल्यामुळे वातावरण तणावपूर्ण झाले. डावलले गेलेले उमेदवार थेट पक्ष नेतृत्व आणि स्थानिक पदाधिकाऱ्यांवर नाराजी व्यक्त करताना दिसून आले. काही उमेदवारांनी तिकीट वाटपात भेदभाव झाल्याचा आरोप केला, तर काहींनी जातीय आधारावर डावलण्यात आल्याचे गंभीर आरोप भाजप पदाधिकाऱ्यांवर केले आहेत.

या घडामोडींमुळे भाजपमधील अंतर्गत गटबाजी आणि नाराजी उघडपणे समोर आली असून, महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर पक्षातील असंतोष कितपत शांत केला जातो, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button