नामांकन अर्ज दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस; जुन्या तहसील झोन परिसरात उमेदवारांची गर्दी

महानगरपालिका निवडणुकीसाठी नामांकन अर्ज दाखल करण्याचा आज अंतिम दिवस असून, उमेदवारांना ३० डिसेंबर दुपारी तीन वाजेपर्यंत अर्ज सादर करता येणार आहे. यामुळे आज सकाळपासूनच नामांकन केंद्रांवर उमेदवार आणि त्यांच्या समर्थकांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे.
महानगरपालिकेच्या जुन्या तहसील झोन परिसरात आज राजकीय हालचालींना मोठा वेग आला आहे. उमेदवारांसह समर्थक व कार्यकर्त्यांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती असून, परिसर गजबजलेला दिसत आहे. विशेषतः प्रभाग क्रमांक १४, १५ आणि १६ मधील उमेदवार नामांकन अर्ज भरण्यासाठी या ठिकाणी दाखल झाले आहेत.
नामांकन प्रक्रियेदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलीस प्रशासनाकडून कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. परिसरात पोलीस अधिकारी व कर्मचारी तैनात असून परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे.
नामांकन अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी राजकीय वातावरण तापले असून, समर्थकांच्या घोषणांनी आणि हालचालींमुळे परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. आता कोणकोणते उमेदवार रिंगणात उतरतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.



