धानोरा कोकाटे येथे मोठी दुर्घटना टळली; ओव्हरलोडिंग ट्रकमुळे शाळेजवळ वीज पोल कोसळले

धानोरा कोकाटे गावात आज एक मोठी दुर्घटना होता होता टळली. क्लीन मॅक्स सन पावर लिमिटेड कंपनीच्या मनमानी आणि निष्काळजी कारभारामुळे गावातील नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. कंपनीचे ओव्हरलोडिंग ट्रक नेहमीप्रमाणे गावातूनच वाहतूक करत असताना गावातील वीजेचे पोल आणि तारा तुटून खाली पडल्या.
या घटनेमुळे संपूर्ण गावाचा वीजपुरवठा विस्कळीत झाला असून नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. विशेष म्हणजे ही घटना थेट जिल्हा परिषद शाळेजवळ घडली. त्याचवेळी शाळेच्या परिसरात लहान मुले खेळत होती. काही क्षणांचा विलंब झाला असता तर मोठी जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
ग्रामस्थांच्या माहितीनुसार, यापूर्वीही अनेक वेळा कंपनीकडे ओव्हरलोडिंग ट्रक गावातून नेण्याबाबत तक्रारी करण्यात आल्या आहेत. मात्र कंपनी प्रशासनाकडून या तक्रारींकडे पूर्णपणे दुर्लक्ष करण्यात आले आहे. गावातून जाणारी अवजड वाहतूक नागरिकांच्या सुरक्षिततेस धोका निर्माण करत असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.
या घटनेनंतर गावातील प्रतिष्ठित नागरिक, युवा नेते आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने घटनास्थळी दाखल झाले. संतप्त ग्रामस्थांनी कंपनीच्या निष्काळजीपणाचा निषेध व्यक्त करत तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली.
ग्रामस्थांची एकच ठाम मागणी आहे की, कंपनीच्या ट्रकसाठी गावाबाहेरून स्वतंत्र बायपास मार्ग तयार करण्यात यावा. जर कंपनी प्रशासनाने वेळीच दखल घेतली नाही, तर भविष्यात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही ग्रामस्थांनी दिला आहे.



