111 वर्षांनंतर पुन्हा सुरू झाला विदर्भातील पहिला मानाचा शंकर पट; जळका (पटाचे) गावात इतिहासाची पुनरावृत्ती

विदर्भाच्या सांस्कृतिक इतिहासात आजचा दिवस सुवर्णाक्षरांनी लिहिला जाणार आहे. तब्बल 111 वर्षांनंतर विदर्भातील पहिला मानाचा शंकर पट पुन्हा एकदा आपल्या मूळ भूमीत—जळका (पटाचे) येथे सुरू झाला आहे. ब्रिटिशकालीन परंपरेला नवसंजीवनी देत, गावकऱ्यांच्या एकजुटीमुळे आणि ग्रामसभेच्या ऐतिहासिक निर्णयामुळे जळका (पटाचे) गाव पुन्हा एकदा पटशौकीनांचे केंद्र बनले आहे.
ग्रामसभेचा ऐतिहासिक ठराव
अमरावती जिल्ह्यातील ग्राम पंचायत जळका (पटाचे) अंतर्गत येणाऱ्या मौजा जळका (पटाचे), शेत गट क्रमांक 215 (5 हेक्टर 45 आर) ही इ वर्ग जमीन आजीवन शंकर पाटासाठी आरक्षित करण्याचा ऐतिहासिक निर्णय ग्रामसभेने 26 जानेवारी 2025 रोजी एकमताने घेतला. गावाच्या नावामागील ऐतिहासिक ओळख जपण्यासाठी आणि जुनी परंपरा पुन्हा जिवंत करण्यासाठी ग्रामसभेने पुढाकार घेत, या जमिनीवर कायमस्वरूपी शंकर पट भरवण्याचा ठराव मंजूर केला.
99 वर्षांच्या लीजवर आयोजनाची जबाबदारी
या जमिनीचे नियोजन व आयोजनाची जबाबदारी गावातीलच “श्री गजानन कृषी गट” यांना 99 वर्षांच्या लीजवर देण्यात आली आहे. या मैदानाला “विदर्भ केसरी शंकर पाटाचे मैदान” असे नामकरण करण्यात आले आहे.
तीन दिवसांचा भव्य-दिव्य शंकर पट
29, 30 आणि 31 डिसेंबर या तीन दिवसांत भव्य, दिव्य आणि जंगी शंकर पाटाचे आयोजन करण्यात आले असून, 29 डिसेंबर रोजी उत्साहात पाटाची सुरुवात झाली आहे. या पाटासाठी संपूर्ण खर्चाचा भार श्री गजानन कृषी गटाने स्वतः उचलला आहे. याठिकाणी खेळणी, नाश्ता, जेवण, तसेच शेतकऱ्यांसाठी शेती उपयोगी साहित्याची दुकाने थाटण्यात आली आहेत.
ब्रिटिशकालीन परंपरेचा वारसा
इतिहासानुसार, ब्रिटिशकालीन सी.पी. अँड बेरार काळात विदर्भातील पहिला शंकर पट याच गावातून सुरू झाला होता. त्यामुळेच या गावाला “जळका (पटाचे)” हे नाव मिळाले. काही कारणांमुळे हा पट सुमारे 111 वर्षांपूर्वी बंद होऊन तळेगाव दशासर परिसरात स्थलांतरित झाला होता. त्या ठिकाणी आजही ही परंपरा जपली जात असून, त्या गावाचाही उल्लेख विशेष मानाने केला जात आहे.
अनुभवी मार्गदर्शनाखाली यशस्वी आयोजन
हा ऐतिहासिक शंकर पट अशोकरावजी घारफळकर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि डॉ. आशिषजी सालणकर यांच्या अध्यक्षतेखाली आयोजन समिती श्री गजानन कृषी गटाच्या माध्यमातून यशस्वीपणे पार पडत आहे.
बंजारा डफली वाद्य विशेष आकर्षण
या पाटाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे तांडा नायक राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली सादर होणारे बंजारा डफली वाद्य, जे उपस्थितांचे विशेष लक्ष वेधून घेत आहे.
राज्यभरातून नामांकित बैलगाडा मालकांचा सहभाग
महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांतून अनेक नामांकित बैलगाडा मालक आपल्या उत्कृष्ट बैलजोड्यांसह या मानाच्या पाटात सहभागी झाले आहेत. या स्पर्धेसाठी सात लाख रुपयांपर्यंतची बक्षिसे ठेवण्यात आली असून, कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात आला आहे.
परंपरेचा अभिमान, संस्कृतीचा उत्सव
आज जळका (पटाचे) गाव पुन्हा एकदा आपल्या वैभवशाली परंपरेचा अभिमानाने गजर करत आहे. 111 वर्षांनंतर सुरू झालेला हा शंकर पट केवळ एक स्पर्धा नसून, तो विदर्भाच्या लोकसंस्कृतीचा, परंपरेचा आणि अस्मितेचा उत्सव ठरत आहे.



