लोकं नाही, तर गडचिरोलीचा विकास धावत आहे – सहपालकमंत्री ॲड. आशिष जयस्वाल

“आज केवळ नागरिक धावत नाहीत, तर गडचिरोलीचा सर्वांगीण विकास धावत आहे. गडचिरोलीकरांची जिद्द, सकारात्मक ऊर्जा आणि एकजूट जिल्ह्याचा कायापालट घडवून आणल्याशिवाय राहणार नाही,” असे प्रतिपादन वित्त, नियोजन, कृषी, मदत व पुनर्वसन, विधी व न्याय, कामगार राज्यमंत्री तथा गडचिरोली जिल्ह्याचे सहपालकमंत्री ॲड. आशिष जयस्वाल यांनी केले.
जिल्हा परिषद गडचिरोलीच्या प्रांगणात पोलीस दलाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘गडचिरोली महामॅरेथॉन’ कार्यक्रमात ते मुख्य अतिथी म्हणून बोलत होते.
मान्यवरांची उपस्थिती
या वेळी अपर पोलीस महासंचालक (विशेष कृती) छेरींग दोरजे, नक्षलविरोधी अभियानाचे विशेष पोलीस महानिरीक्षक संदीप पाटील, जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा, आमदार धर्मरावबाबा आत्राम, आमदार डॉ. मिलिंद नरोटे, उपमहानिरीक्षक अंकीत गोयल, जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. निलोत्पल, केंद्रीय राखीव पोलीस दलाचे उपमहानिरीक्षक (परिचालन) अजय शर्मा, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे, गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे, लॉयड्स मेटल्स अॅण्ड एनर्जी लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक बालसुब्रमण्यम प्रभाकरन तसेच अपर जिल्हाधिकारी नितीन गावंडे यांची प्रमुख उपस्थिती होती.
मुख्यमंत्र्यांच्या शुभेच्छा, आयोजनाचे कौतुक
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या महामॅरेथॉनला शुभेच्छा दिल्याची माहिती देत, सहपालकमंत्री ॲड. जयस्वाल यांनी या उपक्रमाच्या उत्कृष्ट व यशस्वी आयोजनाबद्दल पोलीस प्रशासनाचे कौतुक केले. गडचिरोली जिल्हा आता इतर जिल्ह्यांसाठी प्रेरणादायी ठरत असल्याचेही त्यांनी नमूद केले.
१४ हजार धावपटूंचा उत्स्फूर्त सहभाग
या महामॅरेथॉनला जिल्ह्याच्या विविध भागांतून सुमारे १४ हजार धावपटूंनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. २१, १०, ५ आणि ३ किलोमीटर अशा विविध अंतरांच्या शर्यती घेण्यात आल्या. नागरिक, युवक, विद्यार्थी, महिला तसेच पोलीस व सुरक्षा दलातील जवानांनी मोठ्या उत्साहात सहभाग घेत कार्यक्रम यशस्वी केला.
मान्यवरांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून महामॅरेथॉनला सुरुवात करण्यात आली. विशेष बाब म्हणजे, सहपालकमंत्री ॲड. आशिष जयस्वाल तसेच उपस्थित वरिष्ठ अधिकाऱ्यांनी स्वतः मॅरेथॉनमध्ये धावून सहभाग नोंदविला.
विजेत्यांचा गौरव
- २१ किमी मॅरेथॉन
- महिला गट: साक्षी पोलादवार – प्रथम क्रमांक
- पुरुष गट: रोशन बोदलवार – प्रथम क्रमांक
- १० किमी मॅरेथॉन
- महिला गट: मुन्नी मडावी – प्रथम क्रमांक
- पुरुष गट: रोहन बुरसे – प्रथम क्रमांक
सर्व विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाची पारितोषिके प्रदान करून गौरविण्यात आले.



