बनावट लर्निंग ड्रायव्हिंग लायसन्स प्रकरणातील मुख्य आरोपी बिहारमधून अटकेत

बनावट शिकाऊ वाहन चालक परवाना (Learning Driving Licence) मिळवून देण्यासाठी बनावट संकेतस्थळ तयार करून शासकीय संगणक प्रणालीमध्ये अनधिकृत प्रवेश करत नागरिकांची आर्थिक फसवणूक करणाऱ्या टोळीतील मुख्य आरोपीला बिहार राज्यातून अटक करण्यात आली आहे. ही कारवाई जालना स्थानिक गुन्हे शाखा व सायबर पोलीस ठाण्याच्या संयुक्त पथकाने केली.
या प्रकरणी जालना येथील सहायक मोटार वाहन निरीक्षक तथा उप प्रादेशिक परिवहन अधिकारी अभिजीत कडुबा बावस्कर यांनी दिनांक 26 नोव्हेंबर 2025 रोजी सायबर पोलीस ठाणे, जालना येथे तक्रार दाखल केली होती. अज्ञात आरोपींनी बनावट संकेतस्थळाच्या माध्यमातून अधिकृत सरकारी प्रक्रियेचा गैरवापर करून नागरिकांना बनावट लर्निंग लायसन्स उपलब्ध करून दिल्याचा आरोप या तक्रारीत नमूद करण्यात आला होता.
बिहारमध्ये शोधमोहीम, मुख्य सूत्रधार ताब्यात
गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेता पोलीस अधीक्षक, जालना यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा व सायबर पोलीस ठाण्याचे विशेष पथक तयार करण्यात आले. तपासादरम्यान बिड्डराज प्रमोद यादव (वय 24, रा. टेंगराहा, ता. व जि. सहरसा, बिहार) हा वारंवार वास्तव्य बदलत असल्याचे निष्पन्न झाले.
अखेर 23 डिसेंबर 2025 रोजी पटना, सिमरी बख्तियारपूर व सहरसा परिसरात सखोल शोधमोहीम राबवून आरोपीला ताब्यात घेण्यात आले.
लॅपटॉप, आयफोनसह मुद्देमाल जप्त
आरोपीकडून गुन्ह्यात वापरलेला
- लॅपटॉप
- आयफोन
- थंब मशीन
असा सुमारे 1 लाख 46 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
अटक केलेल्या आरोपीस 28 डिसेंबर 2025 रोजी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
यापूर्वी दोघांना अटक
या गुन्ह्यात यापूर्वी
- फैसल बशीर मीर (रा. जम्मू-काश्मीर)
- मुजाहिद उर्फ डॉन रईसोद्दीन अन्सारी (रा. जालना)
यांना अटक करण्यात आलेली आहे.
संयुक्त कारवाईचे कौतुक
ही संपूर्ण कारवाई पोलीस अधीक्षक जालना, अपर पोलीस अधीक्षक तसेच सहरसा जिल्हा पोलीस प्रशासनाच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा व सायबर पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी संयुक्तपणे यशस्वीरीत्या पार पाडली असल्याची माहिती परिवहन आयुक्त, मुंबई यांनी दिली आहे.



