अमरावती महापालिका निवडणूक: काँग्रेस शहर अध्यक्ष बबलू शेखावत यांनी शांतपणे उमेदवारी दाखल; प्रभाग 8 मध्ये लढत रंगणार

अमरावती महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाकडून उमेदवारी दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. याच अनुषंगाने काँग्रेस शहर अध्यक्ष बबलू उर्फ नितिराजसिंह त्रिलोकसिंह शेखावत यांनी आज आपल्या कुटुंबीयांच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज दाखल केला. कोणतेही शक्तीप्रदर्शन न करता, मोजक्या कार्यकर्त्यांसह त्यांनी नामांकन दाखल केल्याने ही उमेदवारी राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरली आहे.
प्रभाग क्रमांक 8 मधून बबलू शेखावत यांनी आपली उमेदवारी दाखल केली असून, दस्तूर नगर येथील अमरावती महानगरपालिका झोन क्रमांक 3 कार्यालयात नामांकन प्रक्रिया पार पडली. यावेळी त्यांच्यासोबत पत्नी रेखा बबलू शेखावत आणि पुत्र जयराजसिंह बबलू शेखावत उपस्थित होते. प्रभाग क्रमांक 8 जोग स्टेडियम–चपराशी पुरा परिसरातून ते निवडणूक रिंगणात उतरले आहेत.
नामांकनाच्या वेळी कोणतेही शक्तीप्रदर्शन न करता, केवळ निवडक कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला. निवडणूक अधिकाऱ्यांनी अर्जाची तपासणी करून सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केली.
दरम्यान, याच प्रभागातून काँग्रेस पक्षाच्या माजी नगरसेविका अस्मा फिरोज खान यांनी देखील पुन्हा एकदा निवडणूक रिंगणात उतरण्याचा निर्णय घेतला आहे. त्या ओबीसी प्रवर्गातून काँग्रेस पक्षाकडून उमेदवारी लढवत असून, एकाच प्रभागातून दोन काँग्रेस उमेदवार मैदानात उतरल्याने आगामी निवडणूक अधिकच रंगतदार होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
काँग्रेसकडून शांत आणि संयमी पद्धतीने उमेदवारी दाखल होत असतानाच, अमरावतीतील राजकीय वातावरण तापू लागले आहे. प्रभाग क्रमांक 8 मधील ही लढत नेमकी कशी रंगते, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.



