श्री क्षेत्र भीमाशंकर मंदिर तीन महिन्यांसाठी भाविकांना बंद

बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या श्री क्षेत्र भीमाशंकर मंदिरातील सभामंडप व पायरी मार्गाच्या बांधकामासाठी, तसेच भाविकांची सुरक्षितता अबाधित राखत विकासकामे नियोजनबद्ध व कालमर्यादेत पूर्ण करण्यासाठी मंदिर 9 जानेवारी 2026 पासून पुढील तीन महिन्यांसाठी भाविकांच्या दर्शनासाठी तात्पुरते बंद ठेवण्याचा निर्णय श्री क्षेत्र भीमाशंकर देवस्थान संस्थानने घेतला आहे. मात्र, महाशिवरात्रीचा 12 ते 18 फेब्रुवारी 2026 हा कालावधी वगळून मंदिर दर्शनासाठी खुले राहणार आहे.
जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी जितेंद्र डूड्डी यांनी भाविकांनी या निर्णयाला सहकार्य करावे, असे आवाहन केले आहे.
संयुक्त बैठकीत सर्वानुमते निर्णय
राज्य शासनाने श्री क्षेत्र भीमाशंकर मंदिराच्या सर्वांगीण विकासासाठी विशेष विकास आराखडा मंजूर केला आहे. या आराखड्यातील महत्त्वाच्या टप्प्यांची अंमलबजावणी आणि प्रत्यक्ष बांधकामाच्या काळातील सुरक्षितता लक्षात घेऊन 23 डिसेंबर रोजी जिल्हा प्रशासन, भीमाशंकर देवस्थान संस्थानचे विश्वस्त, स्थानिक दुकानदार आणि ग्रामस्थ यांच्या उपस्थितीत झालेल्या संयुक्त बैठकीत सर्वानुमते मंदिर तात्पुरते बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला.
सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर निर्णय
सन 2027 मध्ये नाशिक-त्र्यंबकेश्वर येथे होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर, लाखो भाविक भीमाशंकर येथे दर्शनासाठी येण्याची शक्यता आहे. यासाठी आवश्यक पायाभूत सुविधा, सभामंडप, सुरक्षित प्रवेश-निर्गमन व्यवस्था आणि गर्दी नियंत्रणाची कामे कुंभमेळ्यापूर्वी पूर्ण करणे हे प्रशासनाचे प्राथमिक उद्दिष्ट आहे.
कामाचे स्वरूप आणि व्याप्ती लक्षात घेता, भाविकांची सुरक्षितता अबाधित राखण्यासाठी मंदिर परिसर तात्पुरता बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
पूजाअर्चा सुरू; थेट दर्शन बंद
मंदिर दर्शनासाठी बंद असले तरी श्री भीमाशंकरांची नित्यपूजा, अभिषेक व धार्मिक विधी परंपरेनुसार नियमित सुरू राहणार आहेत. मात्र, या कालावधीत भाविकांना थेट दर्शन किंवा मंदिर परिसरात प्रवेश मिळणार नाही.
बांधकाम यंत्रणा, अधिकृत अधिकारी-कर्मचारी तसेच भीमाशंकर ग्रामस्थ वगळता इतर कोणालाही मंदिर परिसरात प्रवेश दिला जाणार नाही, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
भाविकांनी सहकार्य करण्याचे आवाहन
“श्री क्षेत्र भीमाशंकर मंदिराचा विकास हा दीर्घकालीन सुरक्षितता, सुविधा आणि भाविकांच्या सोयीसाठी अत्यंत आवश्यक आहे. सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर ही कामे वेळेत पूर्ण करण्यासाठी मंदिर तात्पुरते बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. भाविकांनी आणि स्थानिक नागरिकांनी मंदिर संस्थान, जिल्हा प्रशासन व पोलीस प्रशासनाला पूर्ण सहकार्य करावे,” असे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र डूड्डी यांनी केले आहे.



