यवतमाळ: पुसदच्या पारध गावात विहिरीत पडलेल्या बिबट्याला जीवदान; वनविभागाची रेस्क्यू मोहीम यशस्वी

पुसद : यवतमाळ जिल्ह्याच्या पुसद तालुक्यातील पारध गावात एका मादी बिबट्याला विहिरीतून सुखरूप बाहेर काढण्यात वनविभागाला यश आले आहे. वनविभागाच्या या धाडसी आणि तत्पर कामगिरीमुळे एका वन्यजीवाचे प्राण वाचले असून परिसरातून कौतुक होत आहे.
नेमकी घटना काय?
पारध गावातील शेतकरी नारायण राठोड यांच्या शेतातील विहिरीत आज एक बिबट्या पडल्याचे गावकऱ्यांच्या निदर्शनास आले. विहिरीत बिबट्या असल्याचे समजताच परिसरात एकच खळबळ उडाली. गावकऱ्यांनी वेळ न घालवता तातडीने या घटनेची माहिती वनविभागाला दिली.
अशी राबवली रेस्क्यू मोहीम
माहिती मिळताच वनपरिक्षेत्र अधिकारी आनंद सुरत्ने आणि त्यांच्या पथकाने तातडीने घटनास्थळ गाठले. बिबट्या विहिरीत असल्याने रेस्क्यू करणे आव्हानात्मक होते. मात्र, सुरक्षिततेची सर्व खबरदारी घेत वनविभागाच्या पथकाने विहिरीत पिंजरा सोडला. काही वेळाच्या अथक प्रयत्नांनंतर ही मादी बिबट्या पिंजऱ्यात जेरबंद झाली आणि तिला सुखरूप विहिरीबाहेर काढण्यात आले.
नैसर्गिक अधिवासात सुटका
विहिरीबाहेर काढल्यानंतर मादी बिबट्याची प्राथमिक वैद्यकीय तपासणी करण्यात आली. बिबट्या पूर्णपणे स्वस्थ आणि सुरक्षित असल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केल्यानंतर, वनविभागाने तिला तिच्या नैसर्गिक अधिवासात म्हणजेच पैनगंगा अभयारण्यात सुखरूप सोडले.
वनविभागाच्या या यशस्वी मोहिमेबद्दल पारध येथील ग्रामस्थांनी आनंद सुरत्ने आणि त्यांच्या संपूर्ण पथकाचे आभार मानले आहेत.
प्रतिनिधी (दुर्गेश कान्हु)



