Latest NewsMaharashtra

महाराष्ट्र भूषण डॉ. राम सुतार यांना दिल्लीत भावपूर्ण श्रद्धांजली

जागतिक ख्यातीचे शिल्पकार आणि महाराष्ट्र भूषण डॉ. राम वंजी सुतार यांना आज नवी दिल्लीत आयोजित श्रद्धांजली सभेत विविध मान्यवरांकडून भावपूर्ण आदरांजली अर्पण करण्यात आली. मान्यवरांनी आपल्या भाषणांतून त्यांच्या जीवनकार्याचा आणि अमूल्य कलावारशाचा गौरव केला.

डॉ. राम सुतार यांचे 18 डिसेंबर रोजी नोएडा येथे निधन झाले होते. त्यांच्या स्मरणार्थ दिल्लीतील डॉ. आंबेडकर इंटरनॅशनल सेंटरमधील भीम ऑडिटोरियम येथे ही श्रद्धांजली सभा आयोजित करण्यात आली होती.


पंतप्रधानांसह मान्यवरांचे शोकसंदेश

सभेच्या प्रारंभी पंतप्रधान नरेंद्र मोदी, माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद, लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांचे शोकसंदेश वाचन करण्यात आले. या संदेशांतून डॉ. सुतार यांच्या कलासाधनेचा आणि राष्ट्रासाठीच्या योगदानाचा गौरव करण्यात आला.


‘त्यांच्या मूर्ती समाजाला प्रेरणा देतात’ – रामदास आठवले

केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आपल्या भाषणात डॉ. सुतार यांच्या बालपणीच्या शिल्पकलेतील ओढीपासून ते ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’ आणि मुंबईतील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रस्तावित 350 फूट उंच पुतळ्याच्या निर्मितीपर्यंतच्या प्रदीर्घ कारकीर्दीचा आढावा घेतला.

“राम सुतार यांनी घडवलेल्या मूर्ती समाजाला ऊर्जा आणि प्रेरणा देतात. त्यांच्या कलाकृतींमधून इतिहास जिवंत होतो. त्यांचा कलावारसा पुत्र अनिल सुतार समर्थपणे पुढे नेतील,” असे आठवले यांनी सांगितले.


महाराष्ट्र शासनातर्फे श्रद्धांजली

महाराष्ट्र शासनाच्या वतीने निवासी आयुक्त तथा सचिव आर. विमला यांनी श्रद्धांजलीपर भाषण केले. त्या म्हणाल्या, “महाराष्ट्रातील एका छोट्या गावातून सुरू झालेला राम सुतार यांचा प्रवास जागतिक स्तरावर पोहोचला. ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’सारखी महान कलाकृती त्यांच्या अद्वितीय प्रतिभेची साक्ष आहे.”

डॉ. सुतार यांच्या दीर्घ कलासाधनेचा आणि बहुआयामी प्रतिभेचा गौरव करत महाराष्ट्र शासनाने गेल्याच महिन्यात त्यांना महाराष्ट्र भूषण पुरस्काराने सन्मानित केले, याची आठवणही त्यांनी करून दिली.


‘भारतीय कला विश्वाने महान कलावंत गमावला’

महाराष्ट्र परिचय केंद्राचे संचालक हेमराज बागुल यांनीही श्रद्धांजली अर्पण करताना सांगितले की, “राम सुतार यांचे संपूर्ण आयुष्य कलेला समर्पित होते. त्यांच्या निधनाने भारतीय कला विश्वाला जागतिक पातळीवर गौरव मिळवून देणारा एक महान शिल्पकार हरपला आहे.”


कुटुंबीयांच्या आठवणींनी वातावरण भावूक

डॉ. सुतार यांचे पुत्र आणि प्रख्यात शिल्पकार अनिल सुतार यांनी वडिलांच्या साध्या जीवनशैलीच्या, अखंड कार्यमग्नतेच्या आणि कलेवरील निष्ठेच्या हृदयस्पर्शी आठवणी सांगितल्या. सुतार कुटुंबातील समीर आणि सोनाली यांनीही आपल्या भावना व्यक्त केल्या.


मान्यवरांची मोठी उपस्थिती

या श्रद्धांजली सभेला सामाजिक, सांस्कृतिक आणि शिल्पकलेच्या क्षेत्रातील विविध मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button