भयातून विकासाकडे गडचिरोलीची वाटचाल – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

गडचिरोली जिल्ह्यात गेल्या काही वर्षांत झालेल्या आमूलाग्र परिवर्तनामुळे आज येथे भयाचे नव्हे तर विकासाचे, जनतेचे आणि संविधानाचे राज्य प्रस्थापित झाले आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. गडचिरोली पोलीस दलाच्या शौर्यपूर्ण कार्यामुळे जिल्ह्यात शांतता, विश्वास आणि विकासाचा नवा अध्याय सुरू झाल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
गडचिरोली पोलीस दलाच्या पुढाकाराने आयोजित गडचिरोली महोत्सव या सांस्कृतिक कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. या महोत्सवाच्या माध्यमातून जिल्ह्यातील नागरिकांना हक्काचे, अभिव्यक्तीचे आणि सहभागाचे व्यासपीठ मिळत असून कला, क्रीडा, लोकप्रबोधन, नृत्य, गायन आणि मनोरंजनाच्या माध्यमातून सामाजिक जागृती व सांस्कृतिक एकात्मता साधली जात असल्याचे त्यांनी सांगितले.
पोलीस दलाची दुहेरी भूमिका – सुरक्षा आणि विकास
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, गडचिरोली पोलीस दलाने एकीकडे माओवादाविरोधात निर्णायक लढा देत जिल्ह्याला जवळपास पूर्णपणे मुक्त केले, तर दुसरीकडे लोकाभिमुख दृष्टिकोन स्वीकारत महसूल प्रशासनासोबत समन्वय साधला. यामुळे राज्य शासनाच्या विविध विकास योजना जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचविणे शक्य झाले आहे.
‘पुढील 10 वर्षांत गडचिरोली टॉप-5 जिल्ह्यांत’
“आज गडचिरोलीने भरारी घेतली आहे. शिक्षण, आरोग्य, रोजगार, उद्योग आणि पर्यावरण अशा प्रत्येक क्षेत्रात जिल्ह्याची झपाट्याने प्रगती होत आहे. पुढील दहा वर्षांत गडचिरोली महाराष्ट्रातील पहिल्या पाच जिल्ह्यांमध्ये स्थान मिळवेल,” असा विश्वास मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केला.
याशिवाय, दक्षिण भारताचे प्रवेशद्वार म्हणून गडचिरोलीचा विकास करण्यासाठी महाराष्ट्र शासन कटिबद्ध असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
मान्यवरांची उपस्थिती
या कार्यक्रमास वित्त, नियोजन, कृषी, मदत व पुनर्वसन, विधी व न्याय, कामगार राज्यमंत्री तथा गडचिरोलीचे सहपालकमंत्री आशिष जयस्वाल, गृह (ग्रामीण), गृहनिर्माण, शालेय शिक्षण, सहकार व खनिकर्म राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर, अपर पोलीस महासंचालक (विशेष कृती) छेरींग दोरजे, नक्षलविरोधी अभियानाचे विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील, जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा, जिल्हा पोलीस अधीक्षक निलोत्पल, आमदार धर्मरावबाबा आत्राम, आमदार डॉ. मिलिंद नरोटे, गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे, तसेच लॉयड्स मेटल्स अॅण्ड एनर्जी लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक बालसुब्रमण्यम प्रभाकरन यांची प्रमुख उपस्थिती होती.
विजेत्यांचा गौरव
महोत्सवातील विविध सांस्कृतिक स्पर्धांतील विजेत्या स्पर्धकांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा पोलीस अधीक्षक निलोत्पल यांनी केले. यावेळी विविध लोकप्रतिनिधी, अधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.



