नागपूरमध्ये हॉटेलमध्ये माय-लेकाचा आत्महत्येचा प्रयत्न; मुलाचा मृत्यू, पत्नीच्या निधनानंतर कुटुंबावर कोसळला होता दुःखाचा डोंगर

नागपूर : नागपूरमधील वर्धा रोडवरील एका हॉटेलमध्ये बंगळुरूहून आलेल्या माय-लेकाने आत्महत्येचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेत मुलाचा जागीच मृत्यू झाला असून आईची प्रकृती चिंताजनक आहे. पत्नीच्या आत्महत्येमुळे पती आणि सासू प्रचंड मानसिक दडपणाखाली होते, त्यातूनच त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.
नेमकी घटना काय?
मृतक तरुणाचे नाव सूरज असून त्याच्या आईचे नाव जयंती आहे. सूरजचा विवाह अवघ्या दीड महिन्यापूर्वी बंगळुरू येथे झाला होता. मात्र, संसाराची गाठ पूर्णपणे बांधली जाण्यापूर्वीच दोन दिवसांपूर्वी (गुरुवारी) सूरजच्या पत्नीने बंगळुरूमध्ये आत्महत्या केली. या धक्कादायक घटनेनंतर मुलीच्या कुटुंबीयांनी सूरज आणि त्याच्या कुटुंबावर हुंड्यासाठी छळ केल्याचा आरोप करत पोलिसात तक्रार दाखल केली होती.
दडपणाखाली नागपूर गाठले
पत्नीचा मृत्यू आणि त्यानंतर दाखल झालेला गुन्हा यामुळे सूरज आणि त्याची आई जयंती यांची मानसिक स्थिती खालावली होती. याच दडपणातून ते दोघे नागपूरला आले आणि सोनेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वर्धा रोडवरील एका हॉटेलमध्ये मुक्कासाला थांबले. तिथेच दोघांनीही जीवन संपवण्याचा प्रयत्न केला. सूरजने गळफास लावून आपली जीवनयात्रा संपवली, तर त्याच्या आईनेही प्रयत्न केला मात्र त्या बचावल्या आहेत.
पोलिसांची माहिती
सोनेगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नितीन मगर यांनी दिलेल्या माहितीनुसार, मृतक सूरजचा भाऊ संजय सिवन्ना याने पोलिसांना या घटनेची माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला असून सूरजचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे.
पत्नीच्या आत्महत्येनंतर सासरच्या मंडळींनी केलेल्या आरोपांमुळे हे कुटुंब अत्यंत मानसिक तणावात होते, म्हणूनच त्यांनी नागपुरात येऊन हे पाऊल उचलले असावे, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. सोनेगाव पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.



