Crime NewsLatest NewsNanded

नांदेड: सावकारी पाशातून सुटका होईना! घरात घुसून महिलेला अश्लील शिवीगाळ व जीवे मारण्याची धमकी

अर्धापूर : व्याजाने घेतलेले पैसे आणि दागिने परत करूनही पैशांचा तगादा लावत घरात घुसून एका महिलेला अश्लील भाषेत शिवीगाळ आणि पतीसह जीवे मारण्याची धमकी दिल्याचा धक्कादायक प्रकार अर्धापूर शहरात समोर आला आहे. या प्रकरणी अर्धापूर पोलीस ठाण्यात चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, संबंधित महिलेने पोलीस अधीक्षकांकडे न्यायाची मागणी केली आहे.

नेमकी घटना काय?
फिर्यादी महिलेचे पती सय्यद निसार अली यांनी आरोपींकडून व्याजाने पैसे घेतले होते. महिलेच्या म्हणण्यानुसार, व्याजाचे पैसे आणि सोन्या-चांदीचे दागिने आधीच परत करण्यात आले आहेत. तरीही आरोपी फेरोज लाईनमन, शेख आझम, मासूम खान पठाण आणि एका अनोळखी व्यक्तीने (सर्व रा. नांदेड) पैशांच्या मागणीसाठी घरामध्ये बेकायदेशीर प्रवेश केला.

ज्यावेळी घरात फक्त महिलाच होती, तेव्हा या आरोपींनी घरात घुसून अश्लील भाषेत शिवीगाळ केली. “तुझा नवरा पैसे का देत नाही?” असे म्हणत पती-पत्नी दोघांनाही जीवे मारण्याची धमकी दिली.

‘पतीला काही झाल्यास आरोपी जबाबदार’
पीडित महिलेने जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक यांना दिलेल्या तक्रारीत खळबळजनक आरोप केले आहेत. आरोपी फेरोज लाईनमन आणि त्याचे साथीदार माझ्या पतीला आत्महत्येसाठी प्रवृत्त करत आहेत. जर माझ्या पतीला काहीही झाले, तर हे चारही आरोपी जबाबदार असतील, असे महिलेने म्हटले आहे. इतकेच नव्हे तर, पतीच्या जिवाचे बरेवाईट झाल्यास आपणही टोकाचे पाऊल उचलणार असल्याचा इशारा या महिलेने दिला आहे.

पोलीस तपास सुरू
अर्धापूर पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत गुन्हा दाखल केला आहे. आरोपींविरोधात कडक कारवाई करण्याची मागणी फिर्यादी महिलेने केली आहे. अवैध सावकारी आणि मानसिक छळाच्या या प्रकरणात पोलीस आता पुढील तपास करत आहेत.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button